राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकरांची माहिती
कुडाळ –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ( अजित पवार गट ) राज्याचे बंदर तथा युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे लक्ष वेधल्यानंतर ,त्यांच्याच आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्ली व कालावल खाडीतील वाळू लिलावाला मेरीटाईम बोर्डाने परवानगी दिली आहे.त्यामूळे खाडीतील वाळू लिलावाचा मार्ग मोकळा मोकळा झाला आहे,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. नवीन शासनाच्या धोरणानुसार 600 रुपये प्रति ब्रास या दराने या भागात वाळू मिळणे मुश्कील झाले आहे. मेरीटाईम बोर्डाने कर्ली व कालावल या दोन्ही खाडीतील वाळू उत्खननासाठीचा सर्वे करून परवानगी दिली नव्हती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदूर्ग जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व आम्ही सर्वप्रथम प्रांताधिकारी ऐश्र्वर्या काळूशे यांना भेटून या भागातील वाळू लिलाव लवकरात लवकर करावा, अशा प्रकारचे निवेदन दिले होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस ( सिंधुदुर्ग )च्या वतीने आपण स्वतः राज्याचे बंदरे ,युवक कल्याण व क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची 22 नोव्हेंबर रोजी भेट घेऊन चर्चा केली तसेच त्यांनाही निवेदन दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासनाने जाहीर केल्याप्रमाणे अजून पर्यंत 600 रुपये प्रती ब्रास दराने वाळू उपलब्ध होत नाही. आमच्या जिल्ह्यात कालावल व कर्ली या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात यापूर्वी सुद्धा वाळू उत्खननास परवानगी देण्यात आली होती. खनिकर्म विभागाकडे माहिती घेतली असता मेरीटाईम बोर्डच्या अधिका-यांनी केलेल्या निरीक्षणानुसार त्यांनी वाळूसाठा नसल्याचे सांगितल्यामुळे या भागात वाळू उपलब्ध होऊ शकत नाही. परंतु आजही या दोन्ही खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या उत्खनन सुरू आहे. याचा दुष्परिणाम म्हणून स्थानिक लोकांना ती वाळू किमान पाच ते सहा हजार ब्रास प्रमाणे घ्यावी लागते.
तुम्ही मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना वाळूसाठ्याबाबत पुन्हा परीक्षण करण्यास सांगून सहकार्य करावे.जेणेकरून या भागात वाळू लिलाव होऊन जनतेला शासनाच्या ६०० रूपये प्रती ब्रास प्रमाणे वाळू उपलब्ध होईल,अशी मागणी निवेदनाद्वारे मंत्री श्री बनसोडे यांच्याकडे केली होती.तेव्हा श्री बनसोडे यानी संबंधित खात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत उचित कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मेरीटाईमच्या हायड्रोग्राफरने जिल्हाधिकारी ( सिंधुदुर्ग) यांना अहवाल देताना या दोन्ही खाडी मधील वाळू उत्खनन करण्याबाबत अधिकृतरित्या परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच कर्ली व कालावल या दोन्ही खाडीमध्ये वाळू लिलावाची प्रक्रिया होऊन जनतेस अधिकृतरित्या वाळू मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे,असे श्री कुडाळकर यानी पत्रकात म्हटले आहे.









