पुणे / प्रतिनिधी :
राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करून ‘स्टुडंट पोर्टल’वर माहिती अद्ययावत करणे शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, 73 लाख 80 हजार विद्यार्थ्यांची माहिती पोर्टलवरील माहितीशी जुळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली असून, अनेक शाळांकडून सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्राप्त झाले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
शालेय पोषण आहार, आरटीई प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, मोफत पाठ्यपुस्तक गणवेश वाटप, संचमान्यता आदींसाठी आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. नोंदणीबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या. तसेच नोव्हेंबर 2022 मध्ये विशेष अभियानही राबवण्यात आले. शाळांकडून विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंद केल्यानंतर स्टुडंट पोर्टलवरील शाळेच्या नोंदींतील विद्यार्थ्यांचे नाव, जन्म तारीख, लिंग ही माहिती तपासणे आवश्यक आहे. माहिती नोंद केल्यानंतर विद्यार्थ्याचा डेटा आधार प्रमाणिकरणाकडून ऑनलाइन प्रमाणित करून घेण्यात येतो. यात काही विद्यार्थ्यांची माहिती जुळत नसल्याचे आधार प्राधिकरणाकडून कळवण्यात आले आहे. शाळांकडून विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची माहिती आणि आधार कार्डवरील माहिती जशीच्या तशी न भरली गेल्याने त्यात काही चुका झाल्याने माहिती जुळत नसल्याचे दिसून आले आहे.
अधिक वाचा : सहाय्यक प्राध्यापकपदासाठीची पात्रता परीक्षा उद्या








