शासनाकडून ”महात्मा गांधी सेवा पंधरावडयाचे आयोजन ; तहसीलदार श्रीधर पाटील यांची माहिती
सावंतवाडी | प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांचे जातीचे प्रमाणपत्र दाखला, रहिवासी दाखला थेट त्यांच्या शाळेमध्येच दिला जाणार आहे. त्यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ”राष्ट्रपिता महात्मा गांधी सेवा पंधरावडा” सप्ताह आयोजित करण्यात आला असून या कालावधीत शाळांमध्ये थेट विद्यार्थ्यांना महसूल विभागांतर्गत दाखले देण्याचे अभियान हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे दाखले उपलब्ध करून शाळांमध्ये दाखले वितरित करण्याच्या या अभियानाला सर्व शाळांनी साथ द्या. यासाठी गावातील सर्व शाळेतील शिक्षक, तलाठी ,ग्रामसेवक यांच्यामार्फत हे दाखले वितरित करण्यात येणार आहेत. शाळेमध्येच थेट महा-ई-सेवा केंद्राची टीम उपलब्ध होणार आहे अशी माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आज सेवा पंधरवडा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षक ,मुख्याध्यापक , ग्रामसेवक ,तलाठी आदींची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सेवा पंधरवडा सप्ताहाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विविध योजनांविषयीची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.









