केंद्रीय निवडणूक आयोगाने वेबसाईटवर केला डाटा प्रसिद्ध
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांसंबंधीची माहिती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे. न्यायालयाने 15 मार्चपर्यंत ती प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला होता. आयोगाने या कालावधीच्या एक दिवस आधीच ही माहिती सार्वजनिक केलेली आहे. एकंदर 22 हजारांहून अधिक निवडणूक रोखे गेल्या पाच वर्षांमध्ये वितरीत करण्यात आले होते. कोणत्या राजकीय पक्षाला किती देणगी निवडणूक रोखे योजनेतून मिळाली, तसेच निवडणूक रोखे कोणी विकत घेतले, याची सर्व माहिती प्रसिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने 15 फेब्रुवारीच्या आपल्या निर्णयाद्वारे दिला होता. स्टेट बँकेने ही माहिती निवडणूक आयोगाला द्यावी आणि निवडणूक आयोगाने ती आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. माहिती निवडणूक आयोगाला देण्यासाठीचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी करणारी याचिका स्टेट बँकेने सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. मात्र, न्यायालयाने कालावधीवाढ देण्यास नकार देत लगोलग माहिती प्रसिद्ध करण्याचा आदेश दिला. त्यानुसार स्टेट बँकेने 12 मार्चला ही माहिती बंद पाकिटांमधून केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष सादर केली. आयोगाने ती गुरुवारी प्रसिद्ध केली असून त्यामुळे हा विषय आता हातावेगळा झालेला आहे.
देणगीदार कोण ?
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार काही देणगीदार कंपन्यांची नावे आता सार्वजनिक झाली आहेत. या नावांमध्ये ग्रासीम इंडस्ट्रीज, मेघा इंजिनिअरिंग, पिरामर एंटरप्रायझेस, अपोलो टायर्स, लक्ष्मी मित्तल उद्योगसमूहृ एडलवीस समूह, पीव्हीआर, केव्हेंटर, सुला वाईन, वेलस्पन, सन फार्मा इत्यादी कंपन्यांचा समावेश आहे.
700 हून अधिक पृष्ठे
केंद्रीय निवडणूक आयोगाने 2 सूची प्रसिद्ध केल्या असून एकंदर 738 पृष्ठांची ही माहिती आहे. या माहितीत सर्व देणगीदार कंपन्यांची नावे आहेत. तसेच कोणत्या पक्षाला किती देणगी मिळाली, ही माहितीही आहे. तथापि, कोणत्या देणगीदाराने कोणत्या पक्षाला किती देणगी दिली, ही माहिती मिळणार आहे काय, यावर तज्ञांमध्ये दुमत आहे. तथापि, कोणत्या कंपन्यांनी राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत, हे मात्र स्पष्टपणे समजून येणार आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत 16 हजार कोटी रुपयांहून अधिक देणगी हजारो देणगीदारांनी विविध राजकीय पक्षांना दिल्याचे स्पष्ट झालेले आहे.
सविस्तर माहितीस वेळ लागणार
केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व माहिती एकाच वेळी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध पेलेली असली तरी तिचे विश्लेषण करण्यास विलंब लागणार आहे. त्यामुळे या संबंधी सविस्तर आकडेवारी लोकांपर्यंत पोहचविण्यास वृत्तपत्रे, प्रसार माध्यमे आणि इतर माध्यमांना वेळ लागणार आहे. तरी येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता राजकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.
लोकांमध्ये उत्सुकता
- कोणत्या कंपन्यांनी देणग्या दिल्या हे जाणण्याची सर्वसामान्यांना उत्सुकता
- सविस्तर माहिती आणि विश्लेषण स्पष्ट होण्यास काही दिवस वेळ लागणार
- एकंदर पाच वर्षांमध्ये 16 हजार कोटींहून अधिक रकमेच्या दिल्या देणग्या









