बांधकाम स्थायी समिती बैठकीत सेक्शन ऑफिसर्सना केल्या सूचना : सदस्यांनी केली नाराजी व्यक्त
बेळगाव : एखाद्या प्रभागात कोणत्याही प्रकारचे काम हाती घेताना त्याची माहिती स्थानिक नगरसेवकाला दिलीच पाहिजे. याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे, अशी सक्त सूचना अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी बुधवारी झालेल्या बांधकाम स्थायी समिती बैठकीत सर्व सेक्शन ऑफिसर्सना केली. बुधवारी स्थायी समिती सभागृहात झालेल्या बांधकाम स्थायी समिती बैठकीवेळी अधिकारी आपल्या प्रभागात कोणत्याही प्रकारचे काम करताना त्याची माहिती नगरसेवकांना देत नाहीत. त्यामुळे आपल्या प्रभागात नेमके कोणते काम करण्यात आले आहे, याची कल्पना मिळणे कठीण झाले आहे. शहरात किती कूपनलिका आहेत व त्यांच्या देखभालीची जबाबदारी कोणाकडे आहे, अशी विचारणा अधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यावेळी बहुतांश कूपनलिका एलअँडटी कंपनीकडे तर काही कूपनलिका महानगरपालिकेकडे असल्याचे अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी सांगितले.
बहुतांश ठिकाणच्या पाण्याच्या टाक्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यांची दुरुस्ती करण्यात यावी किंवा नवीन बसवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. लवकरच एलअँडटी आणि महानगरपालिकेकडून संयुक्तरित्या पाहणी केली जाणार असून सर्व कूपनलिकांची माहिती फोटोसह येत्या दोन दिवसात सादर करण्यात यावी, अशी सूचना सेक्शन ऑफिसर्सना करण्यात आली. कोणत्याही प्रभागात काम करताना त्याठिकाणी कोणत्या प्रकारचे काम करण्यात आले व ते कधी कुणाच्या उपस्थितीत करण्यात आले. ही माहिती राहण्यासाठी सर्वांनी रजिस्टर मेंटेन करावे, अशी सूचना करण्यात आली. सेक्शन ऑफिसर्सबद्दल बैठकीत अध्यक्ष, महापौर, उपमहापौर व नगरसेवकांनी असमाधान व्यक्त केल्याने अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी ही बाब गांभीर्याने घेत सर्व सेक्शन ऑफिसर्सना भर बैठकीतच उभे करून सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची सूचना केली. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तंतरल्याचे यावेळी दिसून आले.









