अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांचे प्रतिपादन, पंतप्रधान मोदींसाठी भोजनाचे आयोजन
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
भारताचा इतिहास, मानवीय मूल्ये आणि शिकवणीचा प्रभाव साऱ्या जगावर आहे. जगाच्या जडणघडणीत भारताच्या संस्कृतीचे महान योगदान आहे. भारताच्या तत्वज्ञानाने जगातील कोट्यावधी लोकांना प्रोत्साहित केलेले आहे, असे गौरवपूर्ण प्रतिपादन अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी हॅरिस यांनी त्यांच्यासाठी भोजनाचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी त्या उपस्थितांना संबोधून बोलत होत्या.
यावेळी त्यांनी त्यांच्या भारतीय परंपरेचा अत्यंत आदराने उल्लेख केला. आपल्या जीवनात भारतीय संस्कार आणि जीवनपद्धतीचा मोठा आंतर्भाव आहे. भारतीय संस्कारांमुळे आपले जीवन घडले आहे. आपले आयुष्य अमेरिकेत गेले असले आणि आता अमेरिकेच्या संस्कृतीशी आपण पूर्णत: मिसळून गेलो असलो, तरी भारताची आपली असलेली नाळ कधींही तुटणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेसाठी भारतीयांचे योगदान
अमेरिकेच्या प्रगतीत भारतीयांचे योगदान मोठे आहे. आज माझ्याप्रमाणे भारतीय मूळ असणारे अनेक नागरीक अमेरिकेच्या प्रगतीत त्यांचे मोलाचे योगदान देत आहेत हे पाहून आनंद होतो. या भोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित भारतीयांची संख्या अमेरिकेवर असणारा त्यांचा प्रभाव दाखवून देते. भारत हा व्यक्तीश: माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
पंतप्रधान मोदींची प्रशंसा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दशकभरात भारताच्या विकासात महत्वाची भूमिका अंगीकारली आहे. त्यांच्या धोरणामुळे भारताच्या विकासाला आता गती आणि भक्कमपणा लाभला आहे. त्यांच्या नेतृत्वात भारत आज एक जागतिक शक्ती म्हणून नावारुपाला आला असून अमेरिका आणि भारत यांच्यातील भागीदारी अधिकाधिक बळकट होत जाईल. अवकाश संशोधनात भारताने केलेली प्रगती प्रशंसनीय आहे, असे कौतुकही त्यांनी केले.
विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य
भारत आणि अमेरिका यांच्यात आता अवकाश, सागर, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यक, इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये निकटचे सहकार्य निर्माण झाले आहे. गेली अनेक वर्षे या दिशेने प्रयत्न केला जात होता. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, लसीकरण आणि इतर महत्वाच्या मानवीय क्षेत्रांमध्येही दोन्ही देश एकत्र कार्य करीत आहेत. त्यांची ही भागीदारी जगाच्या राजकारणाची आणि अर्थकारणाची दिशा पालटू शकते. या पुढच्या काळात हे सहकार्य अधिकच दृढ होत जाईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अनेक उद्योगपतींशी चर्चा
आपल्या अमेरिका दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील अनेक उद्योगपतींशी चर्चा केली. भारत आता गुंतवणुकीसाठी अनुकूल बनला असून सरकारची धोरणे त्याप्रमाणे आहेत. त्यामुळे अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी भारताची निवड करावी, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय वंशाचे उद्योजक आणि गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्याला त्वरित प्रतिसाद दिला. भारतात येत्या काही वर्षांमध्ये 2.9 लाख कोटी रुपयांची गुंतवणून आपल्या कंपनीकडून केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
दौरा यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया
ड पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा यशस्वी झाल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया
ड संरक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात झालेल्या करारांमुळे भारताचा लाभ शक्य









