सोमवारी तीस ट्रक कांद्याची आवक : नाशिक येथील शेतकरी, व्यापाऱ्यांच्या बंदचा परिणाम
कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांतून विरोध सुरू झाला आहे. नाशिक येथील बाजार समितीत शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सौदे बंद केले आहेत. त्यामुळे राज्यभरात बाजरात समितीत कांद्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी 30 ट्रक कांद्याची आवक झाली. एरव्ही सोमवार ते बुधवार या तीन दिवशी दररोज 50 ट्रक कांदा आवक होत असते. त्यात सोमवारी घट झाल्याचे दिसून आले.
कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात मार्केट यार्डमध्ये सोमवारा r(दि. 21) 5800 पोती कांद्याची आवक झाली. आठवड्याच्या सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा तीन दिवशी दररोज पन्नास ट्रक कांदा बाजार समितीत येत असतो. सोमवारी तीस ट्रक कांदा दाखल झाला. नाशिक येथे कांदा निर्यातीवरील 40 टक्के कराला विरोध सुरू झाला असून केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी नाशिक आणि परिसरातील बाजार समित्यांनी सौदे बंद केले आहेत. त्यामुळे राज्यभरातील आवकेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, कोल्हापुरात सोमवार आलेल्या तीस ट्रक कांद्याच्या आधारावर सौदे काढण्यात आले. मात्र मंगळवारी, बुधवारी किती ट्रक आवक होणार याबद्दल बाजार समितीत संभ्रम आहे.
शेतकरी संघटनांचा निर्यात कराला विरोध
दरम्यान, किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात कर लावण्याच्या आदेशाला कडाडून विरोध केला आहे. या कराविरोधात राज्यभरातील सर्व बाजार समित्या बंद ठेवा, असे आवाहन किसान सभेचे प्रमुख अजित नवले यांनी केले आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी कांद्यावर निर्यात कर लावू केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. मोदी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्याचा फायदा होत असताना कर लावून शेतकऱ्याचे नुकसान करण्याचे काम होत आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.
याबद्दल कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जयंत पाटील यांना विचारले असता सोमवारी तीस ट्रक कांदा आवक झाली. सौदेही काढण्यात आले. मंगळवार, बुधवारी व्यापारी जो काही निर्णय घेतील, त्यावर आमचे लक्ष आहे, त्यानुसार बाजार समिती सौदे काढायचे की, नाही याबाबत निर्णय होईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून सोमवारी आम्ही सौदे काढले होते. असे त्यांनी सांगितले आहे.









