केंद्रीय अर्थविभागाचे प्रतिपादन : धान्योत्पादन वाढण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सध्या असलेली अन्नधान्यांची महागाई अस्थायी आहे. ती फार काळ टिकणार नाही. केंद्र सरकारने महागाई नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना केली असून तिचे परिणाम लवकरच दिसणार आहेत. नवे पीक बाजारात आल्यानंतर किमतींमध्ये घट होऊ शकते. तथापि, जगातील अनिश्चिततेचे वातावरण आणि देशांतर्गत परिस्थिती यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये महागाईचा दबाव अर्थव्यवस्थेवर असू शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थविभागाच्या उच्च अधिकाऱ्यांनी केले आहे.
अर्थविभागाने मंगळवारी जुलै महिन्याचा आर्थिक स्थितीदर्शक अहवाल प्रसिद्ध केला. देशांतर्गत खप आणि गुंतवणुकीत वाढ होत असून हे सुचिन्ह आहे. जुलैत किरकोळ महागाई निर्देशांकात गेल्या 15 महिन्यांमधील सर्वाधिक वाढ झाली आहे. अन्नधान्ये, भाज्या आणि डाळी यांची दरवाढ यंदाच्या जुलैत गेल्या वर्षीच्या जुलैपेक्षा 10 टक्के अधिक आहे. कर्नाटकातील कोलार येथे टॉमेटोच्या पिकावर रोग पडल्याने त्या पिकाच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आणि त्यामुळे या पिकाचे दर वाढले, असेही स्पष्टीकरण अर्थविभागाने दिले आहे.
विशिष्ट वस्तूंच्या दरात वाढ
जुलै महिन्यात काही विशिष्ट वस्तूंच्या दरात वाढ झाली. मात्र, इतर वस्तूंचे दर तुलनेने स्थिर होते. तथापि, टॉमेटोच्या दरात विलक्षण वाढ झाल्याने महागाई निर्देशांकात वाढ झाली. तुरीच्या डाळीचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आयात करण्यात आली. येत्या चार महिन्यांमध्ये भाज्यांच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. तसेच नवे धान्य बाजारात आल्यानंतर महागाई नियंत्रणात येऊ शकते.
ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती
18 ऑगस्टपर्यंत मान्सूनच्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा सहा टक्क्यांनी कमी होते. तथापि, लागवडीचे क्षेत्र 10 कोटी 23 लाख हेक्टर असून ते गेल्यावर्षीपेक्षा 1.1 टक्का जास्त आहे. गहू आणि तांदळाची सरकारी खरेदी उत्तम रितीने सुरु असून अन्नधान्यांचा राखीव साठा सुधारला आहे, अशी माहिती अहवालात आहे.
सरकारी भांडवली खर्चात वाढ
केंद्र सरकारने आपल्या भांडवली खर्चात वाढ केल्याने बाजाराची परिस्थिती सुधारली आहे. मागणीत वाढ दिसत असल्याने आर्थिक विकासाचा दर अधिक होण्याची शक्यता आहे. विकासकामांना गती देण्यात आल्याने नवी रोजगारनिर्मिती झाली असून खासगी गुंतवणुकीतही वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. महागाईचे संकट अद्याप असले तरी एकंदर आर्थिक स्थिती सुधारणेच्या मार्गावर आहे, असा सर्वसाधारण निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे.









