टोमॅटो, खाद्यान्न दरवाढीने महागाई दराचा चटका : जुलैमध्ये किरकोळ महागाई दर 7.44 टक्के : घाऊक महागाई दरही वाढल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जुलै 2023 मध्ये टोमॅटोसह खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाईचा दर पुन्हा एकदा वाढून 7 टक्क्मयांच्या पुढे गेला. ‘सीपीआय’ महागाई जुलैमध्ये 7.44 टक्के इतकी नोंद झाली असून जून 2023 मध्ये ती 4.81 टक्के होती. जुलैमध्ये किरकोळ महागाई दराने आरबीआयच्या निर्धारित 6 टक्क्मयांची पातळी ओलांडल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते. शहरी भागात किरकोळ महागाई दर 7.63 टक्के तर ग्रामीण भागात 7.20 टक्के असेही पृथक्करण करण्यात आले आहे. किरकोळ महागाई बरोबरच जुलै महिन्यात घाऊक महागाई दरातही वाढ नोंदली गेली.
किरकोळ महागाई दराबाबत सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जुलैमध्ये खाद्यपदार्थांच्या महागाई दरात मोठी वाढ झाली आहे. जुलैमध्ये अन्नधान्य महागाई दर 11.51 टक्के होता. हाच दर जूनमध्ये 4.49 टक्के होता. म्हणजेच एकाच महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाईच्या दरात टक्केवारीच्या बाबतीत जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. जुलै महिन्यात भाज्यांच्या महागाईचा दर 37.34 टक्के होता. हा दर जून 2023 मध्ये -0.93 टक्के होता. म्हणजेच एका महिन्यात पालेभाज्या आणि भाज्यांच्या महागाई दरात 38 टक्क्मयांहून अधिक वाढ झाली आहे. डाळींच्या महागाईचा दर 10.53 टक्क्यांवरून 13.27 टक्के झाला. तर मसाल्यांच्या महागाईचा दर 19.19 टक्क्यांवरून 21.53 टक्के झाला. दूध आणि दुग्धजन्य उत्पादनांच्या महागाई दरात किंचित घसरण झाली आहे. जूनमध्ये 8.56 टक्क्यांवर असलेला हा दर जुलैमध्ये 8.34 टक्के नोंद झाला. तसेच तेल आणि तत्सम वस्तूंचा महागाई दर -18.12 टक्क्यांवरून -16.80 टक्के झाल्याने त्यातही वाढ झाली आहे.
घाऊक महागाई दर
घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईचा दर जुलैमध्ये -1.36 टक्के इतका नोंद झाला. इंधनाच्या किमती कमी झाल्यामुळे आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे घाऊक महागाईचा दर शून्याच्या खाली राहिला. मात्र, जून महिन्याच्या तुलनेत (-4.12 टक्के) घाऊक महागाईत वाढ झालेली दिसून येत आहे. एप्रिलपासून हा दर ‘मायनस’मध्ये असून जुलैमध्येही तो शून्याच्या खाली असल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले. खनिज तेल, मूलभूत धातू, रसायने आणि रासायनिक उत्पादने, कापड आणि खाद्य उत्पादनांच्या किमतीत घट झाल्यामुळे जुलै 2023 मध्ये चलनवाढीचा दर नियंत्रित राहण्यास मदत झाल्याचा दावा केला जात आहे.









