सर्वसामान्यांना दिलासा, जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी, दरवाढीचा वेग एप्रिलमध्ये 3.16 टक्के
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एप्रिलमध्ये भारताचा किरकोळ महागाईदर केल्या 6 वर्षांमधील सर्वात कमी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार एप्रिलमध्ये हा दर केवळ 3.16 टक्के आहे. तो जुलै 2019 पासून पाहिले असता सर्वात कमी आहे. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांमध्ये हा दर कमी राहिला आहे.
एप्रिल 2024 च्या तुलनेत ग्राणीम भागात एप्रिल 2025 मध्ये किरकोळ महागाई दर 1.85 टक्के आहे. तर शहरी भागात तो मागच्या एप्रिलच्या तुलनेत 1.64 टक्के आहे. त्यामुळे एप्रिल 2024 च्या तुलनेत सरासरी किरकोळ महागाई दर 1.78 टक्के असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेतही कमी
मार्च 2025 मधील महागाई दराच्या तुलनेत एप्रिल 2025 मध्ये महागाई दरात 91 बेसिस पॉईंट्सची घट झाल्याचे दिसून येत आहे. भाज्या, डाळी, डाळींचे पदार्थ, फळे, मांस आणि मासे, व्यक्तीगत उत्पादने, धान्ये आणि धान्यांचे पदार्थ या साऱ्या श्रेणींमधील पदार्थांचा महागाई दर एप्रिलमध्ये गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी आहे. सर्वसाधारणपणे एप्रिलमध्ये प्रत्येक वर्षीच महागाई दर कमी असतो. तथापि, या एप्रिलमध्ये तो अधिक प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे.
शहर आणि ग्रामीण भाग
शहर आणि ग्रामीण भागात महागाई दर निर्देशांकाचे चित्र एकसारखे नसले तरी, दोन्ही भागांमध्ये तो कमी झाल्याचे दिसत आहे. शहरी भागात महत्वाच्या वस्तूंचा महागाई दर (हेडलाईन इन्फ्लेशन) मार्च 2024 मध्ये 3.43 टक्के होता. तो एप्रिल 2025 मध्ये 3.36 टक्के इतका राहिला. अन्न महागाई दरात शहर भागामध्ये मोठी घट दिसून आली आहे. तो 2.48 टक्क्यांवरुन 1.64 टक्क्यांवर आला आहे, ग्रामीण भागातील महागाई दर शहरभागापेक्षा कमी प्रमाणात कमी झाला असला तरीही तो केवळ 1.84 टक्के आहे, अशी माहिती देण्यात आली.
घरांच्या महागाईदरातही घट
घरे आणि सदनिका यांच्या महागाई दरातही बऱ्यापैकी घट झाल्याचे दिसून येत आहे. मार्च 2025 मध्ये हा दर 3.03 टक्के होता. तर एप्रिल 2025 मध्ये तो 3.00 टक्के इतका आहे. वरकरणी ही घट फारशी मोठी भासत नसली, तर घरांच्या एकंदर किमती लक्षात घेतला, दरवाढीचा वेग कमी होणे हा घर विकत घेणाऱ्यांच्यासाठी एक दिलासा म्हणता येईल, असे मत तज्ञांनी व्यक्त पेले आहे.
इंधन, वीजदरात मात्र काहीशी वाढ
इतर वस्तूंचा महागाई दर कमी होत असताना, ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये इंधन आणि वीजेच्या निर्देशांकात मात्र वाढ झाल्याचे दिसून येते. अनेक राज्यांनी वीजेचे दर वाढविले आहेत. तसेच केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातही 50 रुपयांची वाढ केली होती. त्यामुळे वीज आणि इंधनाचा महागाई निर्देशांक वाढल्याचे दिसून येते, असे प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरुन दिसून येते.
चांगल्या खरीप हंगामामुळे…
यंदाचा खरीप हंगाम शेतीच्या दृष्टीने चांगला गेला. त्याचा सुपरिणाम महागाई दर निर्देशांकावर झाल्याची शक्यता आहे. याविषयीची संपूर्ण आकडेवारी अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र, बाजारांमध्ये सध्या जीवनावश्यक वस्तूंची कोणतीही टंचाई नसल्याचे स्पष्ट होत आहे. उन्हाळ्यात भाजीपाला महाग होतो. पण त्याचे दरही एप्रिल महिना, तसेच मेच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये स्थिरावल्याचे दिसते. यामुळे या वस्तूंचे दर नियंत्रणात आहेत. दुधाच्या दरात काही दिवसांपूर्वी काही राज्यांनी वाढ केली होती. त्यामुळे दुधाच्या महागाई निर्देशांकात काहीशी भर पडली असली, तरीही एकंदर किरकोळ महागाई दर समाधानकारकरित्या नियंत्रणात असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.









