खाद्यतेलासह इतर साहित्याच्या दरात वाढ : फराळ कसा करावा या विवंचनेत सामान्य गृहिणी
प्रतिनिधी / बेळगाव
इंधन दरवाढीपाठोपाठ भाजीपाला, कडधान्य आणि डाळींच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता महागाईच्या कचाटय़ात सापडली आहे. मागील चार दिवसात खाद्य तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे दिवाळीतील फराळाला महागाईची फोडणी बसणार आहे. दिवाळीच्या तोंडावरच खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा दिवाळी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यासाठी धामधूम सुरू आहे. मात्र, खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे दिवाळी सणात फराळाच्या पदार्थांना महागाईची झळ बसली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींच्या बजेटवर मोठा परिणाम झाला आहे. खाद्य तेलाबरोबर फराळाच्या प्रत्येक पदार्थामागे 25 ते 30 रुपयांची आणि किराणा दरात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे फराळ कसा करावा या विवंचनेत सामान्य गृहिणी सापडली आहे.
मागील दोन वर्षात सण-उत्सवांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होत आहेत. गणेशोत्सव, दसरोत्सव त्यानंतर आता दिवाळीचा आनंद
द्विगुणीत करण्यासाठी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आल्याने खरेदीला उधाण आले आहे.
विशेषतः दिवे, पणत्या, आकाश कंदील, फराळाच्या साहित्याला मागणी वाढली आहे. मात्र, सर्वच साहित्याचे दर भरमसाट वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
महागाईला सामोरे जावे लागणार
दिवाळीनिमित्त अनारसे, चकली, कडबोळी, चिवडा, चिरोटे, करंजी आदी पारंपरिक पदार्थांना दिवाळीत विशेष मागणी असते. त्याबरोबर काजू कतली, काजू रोल आणि इतर मिठाईलाही अधिक पसंती दिली जाते. मात्र बेसन, डाळी आणि खाद्य तेलाच्या किमती वाढल्याने फराळ महागणार आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत महागाईचा चटका सहन करावा लागणार आहे. शिवाय दिवाळीच्या साहित्यासाठी आणि फराळासाठी नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कोरोना संकटानंतर यंदा दिवाळी सणासाठी नागरिकांमध्ये उत्साह वाढला असला तरी वाढत्या महागाईला सामोरे जावे लागणार आहे.









