1198 नंतर पहिल्यांदाच घाऊक महागाई 15 टक्क्यांहून अधिक ः इंधनाच्या दरांमुळे सर्वसामान्य त्रस्त
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पार बिघडवून टाकले आहे. अन्नधान्य, इंधन आणि विजेच्या दरात वाढ झाल्याने घाऊक महागाई दर सलग 13 व्या महिन्यात दुहेरी आकडय़ात राहिला आहे. घाऊक मूल्य निर्देशांक आधारित महागाई दर एप्रिलमध्ये 15.08 टक्क्यांवर पोहोचला. डिसेंबर 1998 नंतर पहिल्यांदाच घाऊक महागाई दर 15 टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. डिसेंबर 1998 मध्ये 15.32 टक्के हा दर राहिला होता.
चालू वर्षाच्या मार्च महिन्यात हा महागाई दर 14.55 टक्के तर फेब्ा्रgवारीत 13.11 टक्के राहिला होता. एप्रिल 2021 पासून घाऊक महागाई दर दुहेरी आकडय़ात आहे. तज्ञांनुसार अन्नधान्य आणि इंधनामधील दरवाढीमुळे महागाईत वाढ होत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्चे तेल मोठय़ा प्रमाणात महागल्याने महागाई दर जगभरात वाढू लागला आहे. या युद्धामुळे जागतिक पुरवठासाखळीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
महिना घाऊक महागाई दर
एप्रिल 10.74 टक्के
मे 13.11 टक्के
जून 12.07 टक्के
जुलै 11.16 टक्के
ऑगस्ट 11.64 टक्के
सप्टेंबर 10.66 टक्के
ऑक्टोबर 13.83 टक्के
नोव्हेंबर 14.87 टक्के
डिसेंबर 14.27 टक्के
जानेवारी 2022 13.88 टक्के
फेब्रुवारी 2022 13.11 टक्के
मार्च 2022 14.55 टक्के
एप्रिल2022 15.08 टक्के
इंधन अन् ऊर्जेमुळे महागाईची झळ
एप्रिल महिन्यात अन्नधान्याचा घाऊक महागाई दर 8.35 टक्के राहिला. मार्च महिन्यात हा दर 8.06 टक्क्यांवर होता. इंधन आणि ऊर्जेचा महागाई दर वाढून 38.66 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 34.52 टक्के इतका होता. निर्मित उत्पादनांचा महागाई दर एप्रिलमध्ये 10.85 टक्के इतका राहिला. मार्च महिन्यात हा दर 10.71 टक्के इतका होता. डाळींचा महागाई दर एप्रिलमध्ये 10.85 टक्के इतका राहिला आहे. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच महागाई दर एप्रिलमध्ये 69.07 टक्के होता.
एप्रिल महिन्यात भाज्यांचा महागाई दर 23.24 टक्के होता. मार्च महिन्यात हा दर 19.88 टक्के राहिला होता. फळांच्या दरात 10.89 टक्क्यांची वाढ झाली आहे. गव्हाच्या किमतीत 10.70 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. मार्च महिन्यात ही वाढ 14.04 टक्के होती. अंडी, मांस आणि माशांच्या किमतीत 4.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्च महिन्यात हे प्रमाण 9.42 टक्के राहिले होते.
किरकोळ महागाई दरही वाढताच
यापूर्वी अन्नधान्यापासून खाद्यतेलाचे दर वाढल्याने किरकोळ महागाई दर 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. शासकीय आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दर एप्रिलमध्ये वाढून 7.79 टक्के झाला आहे. यापूर्वी मे 2014 मध्ये हा दर 8.32 टक्के राहिला होता.









