काही नेते भडकाऊ वक्तव्य करून आपल्याकडे लक्ष खेचून घेण्याचा प्रयत्न करत असतात. गोपीचंद पडळकर यांना त्यांच्य़ा नेत्यांनी सूचना दिल्या होत्या. अशा नेत्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करावं असे मत विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि शाश्वत विकास याबाबत नागरिकांनी थेट निरीक्षणं नोंदवावीत, सामाजिक काम करणाऱ्या संस्थांनी देखील यासाठी बदल सुचवावेत असे आवाहनही त्यांनी केले. नागरिकांनी सुचवलेल्या बदलास जिल्हा प्रशासन गांभीर्याने घेत नाही अशी तक्रार असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
निलम गोऱ्हे या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शासकिय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयावर चर्चा केली. “संबंधित खटला हा त्याच वेळी संपला आहे. त्याबाबत मी आता काय बोलणार उद्धव ठाकरे यांच्या बद्दल नितेश राणे यांनी काही मागणी केलीय त्यावर मी काही बोलू शकत नाही. सगळ्याच मुद्दयावर मी बोलणं अपेक्षित नाही.” असेही गोऱ्हे म्हणाल्या.
ललित पाटील प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या “एखादा आरोपी एखाद्या रुग्णालयात जास्त वेळ का राहतो ? त्याला असा कोणता आजार झाला होता हे पाहणं महत्वाचं आहे. सरकारने याबाबत समिती नेमली आहे, त्याचा अहवाल लवकर जाहीर होईल. त्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल. त्या व्यक्तीचे ज्या नेत्यांसोबत फोटो आहेत त्या सगळ्यांची चौकशी होईल.” असेही त्या म्हणाल्या.
“नारी शक्तीची ताकद लक्षात आल्यानंतर आरक्षणाच्या मुद्द्याला सगळ्यांनी उत्स्फुर्त पाठींबा दिला आहे. महिलांना दुखवायचं नाही म्हणून काँग्रेसनं देखील पाठींबा दिला.” असेही त्यांनी नमुद केले.
मराठा आरक्षणावर बोलताना त्या म्हणाल्या, “जरांगे पाटील यांचे आंदोलन थांबावे यासाठी सरकार सकारात्मक आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना नेतृत्व समोर आलं की लोकशाहीवरचा विश्वास वाढतो.”
भाजप आमदार गोपीचंद पड़ळकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलताना निलम गोऱ्हे म्हणाल्या, “सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी पडळकर यांना सूचना दिल्या होत्या. त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी सूचना देणं अपेक्षित आहेत. काही नेते असं असतात की, भडकाऊ वक्तव्य करायचं आणि लक्ष आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला जातो. समाजाने अशा लोकांच्या किंवा नेत्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं. आपण लक्ष दिलं की त्यांना आणखी प्रोत्साहन मिळते.”
महिला सुरक्षा आणि मुलींची परिस्थिती
अपहरण झालेल्या मुलींची संख्या नुकतीच जाहीर झाली आहे. 100 पैकी सुमारे 80 मुली घराकडे परत आल्या आहेत अशी माहिती पोलीस अधिकरी यांनी दिली. सज्ञान झालेल्या तरुण तरुणीला त्यांच्या इच्छेनुसार लग्न करू देतात का? अजूनही आपल्या समाजात तसं घडत नाही, अनेक जिल्ह्यात सैराट सारख्या घटना घडल्या आहेत. अजूनही बाल विवाह होत आहेत. महाराष्ट्रात सरासरी 966 मुलींचा दर आहे, देशात हा दर 991वर गेलाय. याची माहिती सरकार देखील समोर आणत नाही. मुली वाढवा मुली शिकवा या उपक्रमाचे यश असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.








