वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे शनिवारी रात्री उशिरा सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. उरी सेक्टरमध्ये सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्याला ठार करण्यात आल्याची माहिती रविवारी लष्करी सूत्रांकडून देण्यात आली. कमलकोट परिसरात ही घटना घडली. खात्मा केलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागला असून इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या चकमकीपूर्वी शनिवारी सकाळी सुरक्षा दलांनी पुंछमध्ये 2 दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 3 ग्रेनेड आणि 1 पिस्तूलही जप्त करण्यात आले होते. हे दोघेही जम्मू-काश्मीर गजनवी फोर्स नावाच्या संघटनेशी संबंधित दहशतवादी असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.









