वृत्तसंस्था / गुवाहाटी
भारत-बांगलादेश सीमेवर बेकायदेशीर घुसखोरी रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. या भागात रविवारी मध्यरात्री बांगलादेश सीमेवर घुसखोरी रोखण्यात आल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली. श्रीभूमी जिह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर तीन बांगलादेशी नागरिकांना परत हाकलण्यात आले. तीन परदेशी नागरिकांमध्ये एक महिला होती, असे त्यांनी सांगितले.
ईशान्येकडील भारत-बांगलादेश सीमेवर एकूण तीन एकात्मिक तपासणी नाके आहेत. इतर दोन मेघालयातील डावकी आणि त्रिपुरातील अखौरा येथे आहेत. या प्रदेशात भारत-भूतान सीमेवर आसाममधील दरंगा येथे आणखी एक एकात्मिक तपासणी नाका आहे. गेल्यावर्षी शेजारील देशात झालेल्या राजकीय गोंधळानंतर, कायद्यानुसार, बांगलादेशातून गैर-भारतीयांना देशात प्रवेश करण्याचा कोणताही प्रयत्न रोखण्यासाठी राज्य दल आणि बीएसएफ सर्वतोपरी प्रयत्न करतील असे आसाम पोलिसांनी यापूर्वी सांगितले होते.









