बालक, गरोदर महिलांचे आरोग्य धोक्यात : ग्राम पंचायतीने उठविला आवाज : उत्तम दर्जाचे रेशन पुरवण्याची मागणी
वार्ताहर / किणये
बिजगर्णी भागातील अंगणवाडय़ांमध्ये किडलेल्या व निकृष्ट रेशनचे वाटप करण्यात येत आहे. यामुळे बालक व गरोदर महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. किडलेले रेशन वितरित करण्यात येत असल्याचे ग्रा. पं. सदस्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे ग्रा. पं. सदस्यांनी बिजगर्णी ग्राम पंचायत कार्यालयात संबंधित अंगणवाडी शिक्षिका व सुपरवायझर यांना बोलावून सूचना केली. याबाबत वरिष्ठ अधिकाऱयांना कळवून उत्तम दर्जाचे रेशन वितरित करण्यात यावे. अन्यथा, ग्रा. पं. च्यावतीने मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
केंद्र व राज्य सरकारच्यावतीने अंगणवाडीमार्फत शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना व गरोदर महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी दर महिन्याला करोडो रुपये खर्च करण्यात येतात. सध्या तालुक्याच्या सर्रास भागात किडलेले व निकृष्ट रेशन वाटप करण्यात येत आहे. बिजगर्णी ग्राम पंचायतीने या किडलेल्या रेशनबद्दल आवाज उठवून आपल्या भागातील बालकांची व गरोदर महिलांची काळजी घेण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. बिजगर्णी विभागात किडलेले रेशन देण्यात येत असल्यामुळे अंगणवाडी सुपरवायझर हिरेमठ व सर्व अंगणवाडी शिक्षिकांना ग्रा. पं. कार्यालयात बोलावून ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर व सदस्य नामदेव मोरे यांनी निकृष्ट रेशनबद्दल माहिती दिली. सुपरवायझर हिरेमठ यांना ग्रा. पं. च्यावतीने निवेदन देण्यात आले. एक निवेदन सीडीपीओ यांनाही पाठवण्यात आले आहे. या निवेदनाद्वारे बालकांना व गरोदर महिलांना उत्तम दर्जाचे रेशन वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष मनोहर बेळगावकर, सदस्य ऍड. नामदेव मोरे, महेश पाटील, शितल तारिहाळकर, मंगाण्णा जाधव, रेखा नाईक, सेक्रेटरी अनिल पाटील, जितू कागलकर आदीसह अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या.









