वृत्तसंस्था / रिओ-डी-जानेरो
जगातील सर्वात घनदाट समजल्या जाणाऱ्या अमेझॉनच्या जंगलात गेल्या 40 दिवसांपासून हरविलेली चार अर्भके जिवंत सापडली असून त्यांना तेथून परत आणण्यात आले आहे. ही मुले काही नातेवाईकांसह छोट्या विमानातून प्रवास करत असताना विमान अमेझॉनच्या जंगलात कोसळले होते. त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह सापडले होते पण या चार मुलांचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे सरकारी यंत्रणा त्यांचा शोध घेत होत्या. अखेर अपघातानंतर तब्बल चाळीस दिवसांनी ही मुले जंगलात जिवंत मिळाली आहेत. या मुलांची वये अनुक्रमे 13, 9, 4 आणि 11 महिने अशी आहेत. ही सर्व मुले भावंडे असून त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या जिवंत राहण्याची आशा सोडली होती. चाळीस दिवसांनंतरही ही तान्हुली बाळे जिवंत राहिली हा चमत्कारच मानण्यात येत आहे. त्यांना शोधण्यासाठी 150 सैनिकांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच जंगलात राहणाऱ्या वनवासी जमातींचेही साहाय्य या शोधकार्यात घेण्यात आले होते, अशी माहिती आहे.









