रस्त्याची दयनीय अवस्था : ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींबरोबर शासकीय अधिकाऱ्यांचे कानावर हात
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथील चव्हाटा सर्कल ते शाहूनगरपर्यंतच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींबरोबर शासकीय अधिकाऱ्यांचे तर रस्ता डांबरीकरणाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. बेळगाव शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर असलेल्या या गावातील नागरिकांना गुळगुळीत रस्त्यावरून प्रवास करायला कधी मिळणार? तसेच डांबरीकरणासाठी सदर रस्त्याचे भाग्य कधी उजळणार? अशा संतापजनक प्रतिक्रिया असंख्य नागरिकांतून ऐकावयास मिळत आहेत. कंग्राळी बुद्रुकची लोकसंख्या 25 हजारहून अधिक आहे. तसेच शाहूनगर हे बेळगाव महानगरपालिकेचे उपनगर असून गावापासून हाकेच्या अंतरावर आहे. परंतु ग्राम पंचायत लोकप्रतिनिधींना या दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी वेळ नाही.
ग्राम पंचायत मोठी असून सदस्य संख्या 34 आहे. यातील सर्वच सदस्य दररोज बेळगावला ये-जा करतात. परंतु त्यांनासुद्धा रस्त्याची दयनीय अवस्था दिसत नाही हे गावचे दुर्दैव म्हणावे लागेल. तेव्हा आता नागरिकांनाच रस्त्याच्या डांबरीकरणासाठी रस्त्यावर उतरावे लागणार की काय? अशा प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. सदर रस्त्याचे डांबरीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून सात ते आठ वर्षापूर्वी केले होते. तेव्हापासून रस्त्याच्या देखभालीकडे कुणाचे लक्षच नाही. पावसाळ्यात तर खड्ड्यांतून रस्ता शोधत वाहनधारकांना प्रवास करावा लागतो. गणेशचतुर्थीच्या तोंडावर ग्रा.पं.ने ग्रा. पं. फंडातून खड्डेमय रस्ता जेसीबीने दुरूस्त करून तात्पुरता वाहतुकीला मोकळा केला होता. तेव्हापासून धूळमय रस्त्यावरुन नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
विकासापेक्षा अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाबदलीमध्ये अधिक रस
सन 2020-21 मध्ये ग्रा.पं.निवडणूक झाल्यानंतर शासनाच्या आरक्षणनुसार संध्या चौगुले यांची अध्यक्षपदी तर अनिल पावशे यांची उपाध्यक्षपदी निवड केली. सदर निवड अडीच वर्षाच्या कार्यकाळासाठी होती. सव्वा वर्षानंतर संध्या चौगुले व अनिल पावशे यांच्यावर अविश्वास ठराव संमत करून पुढील कार्यकाळासाठी पूनम पाटील यांची अध्यक्षपदी निवड तर यल्लोजी पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड केली. कार्यकाळ संपल्यानंतर परत अडीच वर्षासाठी कौसरजहाँ सय्यद यांची अध्यक्षपदी तर दीपा पम्मार यांची उपाध्यक्षपदी निवड केली. अध्यक्षा सय्यद यांच्यावरही अविश्वास ठराव संमत करण्याच्या हालचाली सुरू असताना सय्यद यांनी धारवाड हायकोर्टातून स्थगिती मिळविल्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला. ग्रा. पं. निवडणुका होऊन आज चार वर्षे झाली. नागरिकांनी सदस्यांना आपापल्या वॉर्डाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडून दिलेले असते. आपापसातील राजकीय हेवेदावे काढायला नव्हे, याचे भान सर्व सदस्यांना असणे गरजेचे आहे. गटबाजीमुळे गावच्या विकासासाठी आलेला मोठा विकास फंड परत वापस जात असल्यामुळे यामध्ये गावचेच मोठे नुकसान होत आहे. यामुळे कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायत असून हरकत नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे. यामुळे आतातरी मोठा विकास फंड मागवून गावचे नंदनवन करण्याची व या रस्त्याचे डांबरीकरण करून घेण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.









