डॉ. ज्ञानेश्वर मुळे : ‘लाईफ इज फन-मेक इट क्रिएटिव्ह’ विषयावर व्याख्यान : सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजन
बेळगाव : कोणतेही राष्ट्र मोठे होण्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक नेतृत्वाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. परंतु जोपर्यंत आपण आपल्या बुद्धीने स्वबळावर आपल्याला हवी तशी यंत्रणा निर्माण करत नाही, स्वतंत्र प्रज्ञेने आपली वाटचाल करणार नाही, तोपर्यंत ही बाब भारतासाठी धोक्याची आहे. आपल्या अनिच्छेने हे विश्व म्हणजे कुटुंब झाले आहे. अशा वेळी आपण संस्कृतीचे भान ठेवून जगाची जी भट्टी बिघडली आहे तिलासुद्धा सांस्कृतिकतेचे अस्तर लावणे आवश्यक आहे, असे मत साहित्यिक व माजी प्रशासकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केले.
सरस्वती वाचनालय शहापूरच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य मराठी विकास संस्था मुंबई अनुदान योजनेंतर्गत ‘लाईफ इज फन-मेक इट क्रिएटिव्ह’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. व्यासपीठावर अध्यक्षा स्वरुपा इनामदार, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, उपाध्यक्ष डॉ. दत्तप्रसाद गिजरे व कार्यवाह आर. एम. करडीगुद्दी उपस्थित होते.
ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, बेळगावबाबत माझ्या बऱ्याचशा आठवणी आहेत. तुकाराम पाटील हा माझा मित्र इथलाच होता. माझ्या पुस्तकाचे प्रकाशन इथेच झाले. एका अर्थाने माझ्या यशाची सुरुवात बेळगावमधूनच झाली. मी जेव्हा प्रशासकीय परीक्षा देत होतो, तेव्हा मराठीमध्ये पुस्तके उपलब्ध नव्हती. त्यामुळे मी तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना पत्र लिहिले, आणि त्यांनी त्याची दखलही घेतली. कारण त्यावेळी मुख्यमंत्र्यांना अशा गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ होता. त्यांच्या या वाक्यावर श्रोत्यांमध्ये खसखस पिकली.
प्रत्यक्ष ज्ञानाने न्यूनगंड दूर
आज राजकारण गमतीच्याही पलीकडे गेले असून त्याचा जीवघेणा खेळ झाला आहे. मी जेव्हा पहिल्यांदा दिल्लीत गेलो तेव्हा राजकारण्यांच्या संपर्कात आलो. त्यापैकी लक्षात राहिले ते यशवंतराव चव्हाण. ते उत्तम वाचक होते. त्यांना भेटण्यास येणाऱ्या प्रत्येकासाठी ते भोजनाची सोय करत असत. दिल्लीमध्ये गेलो तेव्हा मला न्यूनगंड होता. परंतु भाषेचे ज्ञान असणे व प्रत्यक्ष ज्ञान असणे हा फरक लक्षात आल्यावर न्यूनगंड दूर झाला.
आपल्या परदेशातील अनुभवाबद्दल ते म्हणाले, जपानी व्यक्ती प्रत्येक गोष्टीत कलात्मकता आणते. नम्रता त्यांच्या ठायीठायी भरलेली आहे. मैत्री झाली की ते सोडत नाहीत. तेथील प्रत्येक व्यक्ती डायरी लिहिते. त्यामुळे तो त्यांचा राष्ट्रीय छंद आहे. रशियामध्ये मद्यपानाचे प्रमाण अधिक आहे व आपण त्यांच्यासोबत जर मद्यपान केले नाही तर ते ‘आर यु नॉट माय फ्रेंड? इंडिया इज नॉट अवर फ्रेंड?’ असा प्रश्न करतात. अशा वेळी काही युक्ती करून आम्हाला कोक पित मद्यपान करत असल्याचा अभिनय करावा लागला. मॉरिशसमध्ये सोन्याच्या खाणीत काम करण्याच्या कारणास्तव भारतातून प्रचंड शेतमजूर गेले. या सर्वांच्याकडे रामचरितमानस हा ग्रंथ आहे. त्यामुळे माणूस कोठे आपली अस्मिता विकसित करेल हे सांगता येत नाही. हा एकमेव असा देश आहे जेथे भारतीय वंशाचे पाच ते सहा पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष आहेत.
आज सर्व परकीय तंत्रज्ञान आपण आत्मसात केले आहे. परंतु ते घातक ठरणार आहे. आपण जर स्वतंत्र प्रज्ञेने आपली स्वत:ची यंत्रणा, तंत्रज्ञान विकसित करू शकलो नाही तर आपली वाटचाल खडतर होईल हे लक्षात घ्यायला हवे. युवा पिढीला थांबविणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर आपले राष्ट्र मोठे होण्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक नेतृत्वाला विचार करणे भाग आहे, असे ते म्हणाले. प्रारंभी रुचिरा नातू हिने स्वागतगीत सादर केले. स्वरुपा इनामदार यांनी प्रास्ताविक केले. त्यांच्यासह सुहास सांगलीकर यांनी ज्ञानेश्वर मुळे यांचा सत्कार केला. त्यांचा परिचय करून देऊन सूत्रसंचालन व आभार मनीषा सुभेदार यांनी मानले.
…तर देशात मराठी लोकांचे राज्य असते
दुर्दैवाने दिल्लीमध्ये मराठी माणसाच्या स्मृती जपल्या गेल्या नाहीत. इंग्रजी सत्ता नसती तर देशात मराठी लोकांनी राज्य केले असते. भारताला विश्वगुरु व्हायचे आहे आणि बिघडलेल्या जगाच्या भट्टीला सांस्कृतिक अनुष्ठानही द्यायचे आहे. भारतीय संस्कृतीने जगाला जे दिले त्याचे मूल्यमापन करता येणार नाही. भविष्यात येणारे जग संकटाच्या कठड्यावर आहे. अशा वेळी विषमता व सामाजिक तणाव नष्ट होण्याची नितांत गरज त्यांनी व्यक्त केली.









