प्रतिनिधी /पणजी
बांबोळी येथील मानसोपचार रुग्णालयातील (आयपीएचबी) एक टेक्निशियन कर्मचारी सतीश गोविंद नाईक यांनी बोगस पात्रता प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवल्याची तक्रार जॉन नाझारेथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.
पत्रकारांना माहिती देताना नाझारेथ यांनी सांगितले की त्यांना नाकरीतून बडतर्फ करावे अशी आमची मागणी आहे. सुमारे 12 वर्षापासून ते नोकरीत असून 2010 मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिलेला रहिवासी दाखलाही बोगस असून पात्रतेचे प्रमाणपत्रही बनावट आहे असा दावा नाझारेथ यांनी करुन तशी माहिती तक्रारीतून दिली आहे.
नाझारेथ पुढे म्हणाले की आगशी पोलिस स्थानकात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली होती परंतू तिची कोणी दखलच घेतली नाही व कारवाई केली नाही. पोलिसांनी त्याऐवजी ती तक्रार मानसोपचार रुग्णालयाकडे पाठवली परंतू तेथेही काहीच कारवाई झाली नाही. सदर टेक्निशियनची योग्य ती पात्रता नसताना तो सेवेत आहे असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रुग्णालय संचालकांनी देखील कारवाई टाळाटाळ केली. असल्याने आता पंतप्रधान – मुख्यमंत्री यांचे दरवाजे आपण ठोठवले असून त्यांनी तरी कारवाईचे निर्देश संबंधितांना द्यावेत असे सुचविल्याचे नाझरेथ यांनी सांगितले.









