डब्यांसाठी खर्ची घातलेला निधी वाया : डस्टबिन ऐवजी बाजूलाच कचरा टाकण्याचे प्रकार
प्रतिनिधी / बेळगाव
स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत केंद्र शासनाने कोट्यावधी निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्याची सूचना महापालिकेला केली होती. यानुसार शहरात येणाऱ्या नागरिकांना कचरा टाकण्यासाठी रस्त्याशेजारी डस्टबिन बसविण्यात आले आहे. मात्र डस्टबिन ऐवजी बाजूला कचरा टाकण्यातच बेळगावकर धन्यता मानत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कचरा डब्यांसाठी खर्ची घातलेला निधी वाया गेला आहे. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत स्वच्छतेची उपकरणे खरेदी करण्यासाठी प्रत्येक वषी निधी मंजूर केला जात आहे. तसेच विविध अनुदानातंर्गत स्वच्छतेसाठी निधीची तरतूद करण्याची अटी घालण्यात आल्या आहेत. तसेच आवश्यक ठिकाणी डस्टबिन, भूमिगत कचरा पुंड्या व इतर साहित्य खरेदी करण्यासाठीदेखील सूचना केली आहे. बेळगाव महापालिकेला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाल्याने शहरवासियांना स्मार्ट बनविण्याच्यादृष्टीने प्रमुख बाजारपेठेतील रस्त्याशेजारी स्मार्ट डस्टबिन बसविण्याची सूचना महापालिकेला करण्यात आली होती. त्यामुळे महापालिकेने 25 लाखांचा निधी खर्च करून बाजारपेठेसह खडेबाजार, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, शहापूर, गणपत गल्ली, माऊती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, आदींसह विविध ठिकाणी लहान आकाराचे डस्टबिन बसविण्यात आले होते. मात्र व्यावसायिक आस्थापनातील कचरा जास्त प्रमाणात असतो. दुकानातील कचरा वाहनाकडे देण्याऐवजी या डस्टबिनमध्ये टाकला जात असल्याचे निदर्शनास आले होते. मुख्यत: डस्टबिन बसविण्याचा उद्देश काय? हेच महापालिकेने सर्वसामान्य नागरिकांना सांगितले नाही. त्यामुळे काही ठिकाणी डस्टबिनचा वापर होत आहे. तर कचरा जास्त असल्याचे सांगून डस्टबिनच्या खाली रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरू आहे. वास्तविक, बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, त्यांच्या हातातील कचरा डस्टबिनमध्ये टाकावा, या उद्देशाने लहान आकाराचे डस्टबिन ठिकठिकाणी बसविण्यात आले होते. मात्र याचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिकेने लक्ष देण्याची मागणी
बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांऐवजी स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिक या डब्यामध्ये घरातील व दुकानातील कचरा टाकत असल्याचे दिसून येत आहे. पण डस्टबिन बसविण्यात आलेल्या ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याने नवीन कचराकुंडी निर्माण होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष देऊन डस्टबिन बसविण्यामागचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहोचवावा व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.









