मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : ईडीसीकडून स्वीकारला 86.20 लाखांचा धनादेश
पणजी : राज्यातील अनेक सरकारी महामंडळे एक तर अकार्यक्षम किंवा सतत नुकसानीत चालत असून अशा महामंडळांचे लेखाजोखा अहवाल तयार करून नंतर ती बंद करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. आर्थिक विकास महामंडळातर्फे शुक्रवारी पणजीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ईडीसीकडून सरकारला लाभांश प्रदान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ईडीसीचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याहस्ते ऊ. 86,20,260/- चा लाभांश धनादेश प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तो स्वीकारला. त्यावेळी ईडीसीचे व्यवस्थापकीय संचालक बी. आंगले, उपाध्यक्ष संजय सातार्डेकर आणि सहव्यवस्थापकीय संचालक बी. एस. बोरकर यांची उपस्थिती होती. आर्थिक विकास महामंडळातर्फे राज्यातील औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील प्रकल्प तसेच मुख्यमंत्री रोजगार योजना आणि अन्य तत्सम योजनांद्वारे नवीन उद्योजकांना सदैव प्रोत्साहन देण्यात येते. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आणि राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी ईडीसीची भूमिका महत्त्वाची आहे. पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी ईडीसी यशस्वीरित्या कार्यरत असल्याचे सांगून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि राज्याच्या विकासासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महामंडळ नफा नोंदवत असून सरकारला लाभांशही देत असल्याचे ते म्हणाले. या यशाबद्दल त्यांनी श्री. तानावडे यांच्यासह ईडीसी टीमचेही अभिनंदन केले आणि पुढील विकासकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.









