ऑनलाईन टीम
टीम इंडियाने प्रजासत्ताक दिनी देशवासीयांना विजयी भेट दिली आहे. सलामीवीर लोकेश राहुलने केलेल्या फटकेबाजीमुळे दुसऱ्या टी 20 सामन्यातही न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताने पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत आता 2-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडने दिलेले 133 धावांचे आव्हान टीम इंडियाने 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.
न्यूझीलंडविरद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात १३३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलमीवीर रोहित शर्मा ८ धावा करून परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (११ धावा) फार काळ मैदानावर तग धरू शकला नाही. त्यामुळे सहाव्या षटकात भारताची अवस्था २ बाद ३९ अशी झाली. त्यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरत महत्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी केली. श्रेयस अय्यर विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि शिवम दुबेने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून लोकेश राहुलने नाबाद ५७ तर श्रेयस अय्यरने ४४ धावा केल्या.
दरम्यान, पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर न्यूझीलंड भारतीय संघाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. आज ऑकलंडमध्ये होत असलेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार केन विल्यमसनने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सामन्याच्या तुलनेत न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. त्यामुळे न्यूझीलंड संघाला निर्धारित २० षटकांत ५ बाद १३२ पर्यंत मजल मारता आली. रविंद्र जडेजाने दोन तर शार्दुल ठाकूर, शिवम दुबे आणि जसप्रित बुमराह यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दरम्यान, सध्याच्या घडीला भारत मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडने दिलेलं 204 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं होतं.