ऑनलाईन टीम
भारत आणि इंग्लंडमध्ये झालेल्या अंतिम टी 20 सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांची टी 20 मालिका 3-2 ने जिंकली. भारताच्या 225 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला निर्धारित 20 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने 36 धावांनी विजय मिळवला.
भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि अंतिम टी 20 सामन्यात धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडला अंतिम सामन्यासह मालिका विजयासाठी 225 धावांचे तगडे आव्हान दिले. भारतीय संघाने सलामीवीर रोहित शर्मा (64) आणि विराट कोहली (80) यांच्या अर्धशतकांच्या बळावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 224 धावा केल्या.
तत्पूर्वी, भारतीय संघाची दमदार सुरुवात झाली. रोहित-विराट जोडीने पहिल्या गड्यासाठी 94 धावांची भागिदारी केली. रोहित शर्माची जोरदार फटकेबाजी सुरू असातानाच बेन स्टोक्सचा चेंडू थेट यष्टीत घुसला. रोहित त्रिफळाचित झाला तेव्हा त्याने पाच षटकार आणि चार चौकारांची बरसात करत 34 चेंडूत 64 धावा केल्या होत्या. त्यानंतर मैदानात आलेल्या मुंबईकर सूर्यकुमार यादवनेही सुरुवातीपासूनच मोठे फटके लगावायली सुरुवात केली. आदिल रशीदने सूर्यकुमारला जेसन रॉय करवी झेलबाद केले. तोपर्यंत 17 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार अशी फटकेबाजी करत त्याने 34 धावा केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्यासोबत सलामीवीर विराटने जोरदार फटकेबाजी केली. विराट कोहलीने 52 चेंडूत नाबाद 80 धावांची खेळी केली. यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तर हार्दिक पांड्यानेही लौकिकास साजेसा खेळ करत 17 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 39 धावा केल्या. त्यामुळे भारताने निर्धारित 20 षटकांत 224 धावांचा डोंगर उभारला.
दरम्यान, भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असणाऱ्या टी20 मालिकेत आज अंतिम आणि निर्णायक सामना होत आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंड संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्मासोबत सलामीला मैदानात उतरत क्रिकेट प्रेमींना धक्का दिला. गेल्या चार सामन्यात सातत्याने अपयशी ठरत असणाऱ्या केएल राहुलला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. राहुलच्या जागी जलदगती गोलंदाज टी नटराजनला संधी देण्यात आली आहे. तर इंग्लंड संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.