कोल्हापूर :
महाविकास आघाडीचे काही खासदार–आमदार हे महायुतीतील पक्षात प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून केले होते. उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोस येथे खासदार – आमदार फोडण्याचा उद्योग करण्यासाठी गेले होते काय असा सवाल शुक्रवारी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच दावोस येथे देशातील उद्योजकांना नेवून राज्यात गुंतवणूक केल्याचा देखावा दाखवला जात असल्याची टिकाही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी सकाळी त्यांनी पंचशिल हॉटेल येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आर. के. पवार, शाहू ग्रुपचे समरजित घाटगे, नंदाताई बाभूळकर, रामराजे कुपेकर, स्वाती कोरी, राजीव आवळे, बाजीराव खाडे उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे मेळावे गुरुवारी मुंबईमध्ये पार पडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करण्याचा अधिकार दोघांनाही आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या सभेला गर्दी अधिक असल्याची मिश्कील टिपणीही त्यांनी केली. केंद्रीय मंत्री अमित शहा पक्ष फोडण्याची भाषा करत आहेत, ही भाषा ते कुठे शिकले हे तपासले पाहिजे असा टोलाही पवार यांनी लगावला. मणिपूर प्रकरणावरुन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे भाजपचा पाठिंबा काढून घेतली असे वाटत नाही. जरी नितीशकुमार यांनी पाठिंबा काढून घेतला तरी त्याचा सरकारला धोका होईल असे वाटत नसल्याचेही पवार यांनी सांगितले.
- ठाकरे टेकाचा निर्णय घेणार नाहीत
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. या विषयी बोलताना पवार म्हणाले, ‘ठाकरे यांच्याशी काही दिवसापूर्वी माझी चर्चा झाली होती. त्या भेटीत त्यांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढाव्यात असे पदाधिक्रायांचे मत असल्याचे सांगितले होते. या बैठकीत दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे. यामध्ये त्यांनी कुठेही टोकाची भूमिका घेतली नाही तसेच आगामी काळातही ते कोणताच टोकाचा निर्णय घेणार नाहीत असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
- गडहिंग्लज येथील कारखान्याबाबत चर्चा
खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान बंद दरवाजा आड चर्चा झाली याबाबत बोलाताना शरद पवार म्हणाले, ही भेट गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे कारखान्याबाबत झाली आहे. कारखान्याचे संग्रामसिंह नलवडेही या बैठकीस उपस्थित होते. या कारखान्याच्या कामगारांची देणी थकली आहेत, तसेच कारखाना पुन्हा सुरु कसा करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक होती. कारखान्याच्या मालकीची जमिन आहे. यापैकी काही जमीन विकून कामगारांची देणी भागवता येतील काय तसेच उरलेल्या पैशातून कारखाना सुरु करण्याबाबत ही चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच या प्रश्नावरुन पुणे विभागीय महसुल आयुक्त, साखर संचालकांसह अन्य अधिकाऱ्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीमध्ये कोणताही राजकीय विषय नसल्याचेही त्यांनी सांगितले.
- दावोसमध्ये उद्योगमंत्र्यांचे उद्योग काय
महाविकास आघाडीमधील काही आमदार – खासदार महायुतीमध्ये येणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला होता. उद्योगमंत्री दावोस येथे नेमके कशासाठी गेले होते. तेथे त्यांनी कोणते उद्योग केले असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. तसेच दावोस येथील दौरा आमदार खासदार फोडण्यासाठी होता काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे दाखविण्यात येत आहे. मात्र देशातीलच उद्योगपतींना दावोस येथे नेवून करार करण्याचा देखावा केला जात असल्याची टिकाही शरद पवार यांनी केली.








