25 टक्के शेतकऱ्यांनी खळ्यात-घरात भात ठेवले राखून
वार्ताहर/काकती
इंद्रायणी भाताच्या दरात वाढ झाली असून, गेल्या दोन दिवसांत 2400 रुपये प्रति क्विंटल भाव स्थिर झाला आहे. काकती, होनगा येथील अद्याप 25 टक्के शेतकऱ्यांनी खळ्यात व घरात भात राखून ठेवले आहे. भाव वाढीसाठी थांबलेले शेतकरी रोखीने भातविक्री करीत आहेत. दीपावलीच्या पहिल्या आठवड्यात सुगी हंगामात इंद्रायणीचा भाव 2500 ते 2400 रुपये झाला होता. भात मळणीचा हंगाम जोर झाल्याने विक्री करण्यासाठी शेतकरी बांधवांनी घाई केली. बाजारात आवक वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी संगनमत करून 2200 रुपयांनी खरेदी भात केले. त्यानंतर नोव्हेंबरच्या प्रारंभी थोडी आवक कमी होताच 2250 ते 2300 रुपयेपर्यंत भात खरेदी केले. आता गेल्या दोन दिवसांत 2350 ते 2400 रुपयांनी इंद्रायणी भाताचा भाव स्थिर झाला आहे. बाजारात इंद्रायणी तांदळाला लोकांची अधिक पसंती असल्याने भाववाढ होत आहे. बियाणे, खत, कीटकनाशके मजुरी यांच्या दरात दोन पटीने वाढ झाली. तर या नवीन हंगामाच्या सुरुवातीला तांदळाच्या दरात 15 टक्के दरवाढ झाली आहे. भाताचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.









