कोल्हापूर :
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना आठ दिवसांमध्ये दुसऱ्यांदा जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने सोशल मिडीयावर मॅसेज करत ही धमकी दिली आहे. सावंत माजला असून, थोड्याच दिवसांचा पाहुणा असल्याचा धमकी वजा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. शुक्रवारी फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने इंद्रजित सावंत यांच्या मोबाईलमधील डेटा कॉपी करुन घेतला तसेच सावंत यांचे व्हॉईस सॅम्पलही घेतले.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोन करुन जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कोरटकरला अटक करण्याच्या सूचना पोलिसांना केल्या. यानंतर मंगळवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरटकरच्या मोबाइल लोकेशनवरून जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे एक पथक त्याचा शोध घेत आहे. कोरटकरचे शेवटचे लोकेशन नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात आढळले आहे. त्यानंतर त्याचा मोबाइल बंदच असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे नातेवाईक आणि मित्रांकडे चौकशी सुरू करण्यात आली आहे. कोरटकरचे कुटूंबियांकडेही चौकशी करण्यात येणार आहे. मात्र कोरटकरचे घर बंद आढळून आले आहे. इंदोर आणि पुसद येथे तो गेल्याच्या चर्चा आहे. या दृष्टीने कोल्हापूर पोलिसांचे पथक तपास करत आहे.
- आठ दिवसांत दुसऱ्यांदा धमकी
दरम्यान कोरटकर याचे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी सकाळी इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी देण्यात आली. केशव वैद्य नावाच्या एका व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली. सावंत माजला आहे. थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जावून खात्मा करु अशी धमकी युट्यूब चॅनेलच्या कमेंट बॉक्स दिली आहे. यानंतर कोल्हापूर पोलीसही अलर्ट झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सुरु होते.
- फॉरेन्सिककडून मोबाईल डेटा कॉपी
दरम्यान कोरटकर धमकी प्रकरणात शुक्रवारी कोल्हापूर फॉरेन्सिक विभागाचे सायबर सेलचे पथक दिवसभर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात होते. तीन अधिकाऱ्यांच्या या पथकाने सावंत यांच्या मोबाईलमधील डेटा कॉपी करुन घेतला. त्यातील मॅसेज आणि इतर संदेशही कॉपी करुन घेतले आहेत. या सर्वांचे हॅश व्हॅल्यू काढून हे सिल करण्यात आले आहेत.
- आवाजाचे नमूने घेतले
फॉरेन्सिक पथकाने इंद्रजित सावंत यांच्या आवाजाचे नमुनेही शुक्रवारी घेतले आहेत. कोरटकर कडून धमकी आल्यानंतर जे संभाषण झाले होते त्याच पद्धतीचे नमुने घेण्यात आले आहेत. हे नमुने आणी संभाषण यांची पडताळणी करण्यात येणार आहे.








