प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी : संचलनात भाग घेणार इंडोनेशियन बँडपथक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा पहिला भारत दौरा असून यात ते भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून सामील होणार आहेत. दिल्ली विमानतळावर सुबियांतो यांचे विदेश राज्यमंत्री पवित्रा मार्गारिटा यांनी स्वागत केले. सुबियांतो यांचा हा दौरा भारत-इंडोनेशियाच्या संबंधांना अधिक मजबूत करणार असल्याचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी म्हटले आहे.
अध्यक्ष सुबियांतो यांच्या या दौऱ्यात अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण करार होण्याची शक्यता आहे. हा दौरा भारत आणि इंडोनेशियादरम्यान रणनीतिक भागीदारी मजबूत करण्याची संधी प्रदान करणार आहे. मागील काही वर्षांमध्ये भारत आणि इंडोनेशियाच्या संबंधांमध्ये विशेष स्वरुपात दृढता दिसून आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2018 साली इंडोनेशियाचा दौरा केला होता. तर मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांची भेट झाली होती.
भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सामील होणारे सुबियांतो हे इंडोनेशियाचे चौथे अध्यक्ष ठरतील. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात इंडोनेशियाचे 352 सदस्यीय मार्चिंग आणि बँड पथक भाग घेणार आहे. इंडोनेशियाचे मार्चिंग आणि बँड पथक पहिल्यांदाच विदेशात राष्ट्रीय दिन संचलनात भाग घेणार आहे.
संबंध बळकट होणार
भारत आणि इंडोनेशिया यांच्यात सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध हजारो वर्षांपासून मजबूत राहिले आहेत. दोन्ही देश सागरी शेजारी असून परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे. सुबियांतो यांच्या या दौऱ्याद्वारे दोन्ही देशांदरम्यान सहकार्य वृद्धिंगत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे आगामी काळात द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होणार आहेत.









