वृत्तसंस्था /नवी दिल्ली
गुवाहटीमध्ये अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या राष्ट्रीय बॅडमिंटन केंद्रामध्ये इंडोनेशियाचे मुलयो हँडोयो यांची एकेरीच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुवाहटीमध्ये नव्यानेच बांधण्यात आलेल्या या बॅडमिंटन केंद्रामध्ये सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून याठिकाणी बॅडमिंटनपटूंना प्रशिक्षक आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेने आणखी दोन विदेशी बॅडमिंटन प्रशिक्षकांची नियुक्ती लवकरच करणार असल्याचे समजते. या केंद्रामध्ये रशियाचे माजी अखिल इंग्लंड चॅम्पियन इव्हान सोझोनोव्ह यांची दुहेरीचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळवणाऱ्या पी व्ही सिंधूला मार्गदर्शन करणारे कोरियाचे पार्क तेई सँग हे या केंद्रात तिसरे विदेशी प्रशिक्षक म्हणून राहतील. या केंद्रामध्ये विदेशी प्रशिक्षकांसमवेत भारतीय प्रशिक्षकही बॅडमिंटनपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी सहकार्य करतील. अखिल भारतीय बॅडमिंटन संघटना आणि आसाम शासन यांचा हा संयुक्त उपक्रम राबवला जात आहे. अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या या नव्या राष्ट्रीय केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी होणार आहे. या केंद्रामध्ये 24 बॅडमिंटन कोर्टची सुविधा असून 3000 प्रेक्षकांच्या क्षमतेची सुविधा त्याचप्रमाणे जीम आणि योगा केंद्र, बॅडमिंटनपटूंसाठी हॉस्टेलची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे संघटनेचे सचिव संजय मिश्रा यांनी सांगितले. हैदराबादमध्ये पी. गोपीचंद बॅडमिंटन अकादमी तर बेंगळूरमध्ये पदुकोन-द्रविड बॅडमिंटन अकादमी सध्या कार्यरत आहे. याच धर्तीवर आता गुवाहटीमध्ये बॅडमिंटनचे नवे केंद्र उघडले जाणार आहे. इंडोनेशियाचे प्रशिक्षक मुलयो यांचे 2004 साली अॅथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या इंडोनेशियाच्या तौफिक हिदायतला बहुमोल मार्गदर्शन लाभले होते.









