वृत्तसंस्था/ जकार्ता
मंगळवारपासून येथे सुरु होणाऱ्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या इंडोनेशिया खुल्या सुपर 1000 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय स्पर्धकांचे नेतृत्व एच. एस. प्रणॉयकडे राहिल.
भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू प्रणॉयने गेल्या महिन्यात मलेशिया मास्टर्स सुपर 300 दर्जाच्या बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. आठव्या मानांकित प्रणॉयचा इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेत सलामीचा सामना जपानच्या निशीमोटोशी होणार आहे. त्यानंतर प्रणॉयला दुसऱ्या फेरीत चीनच्या युक्वीशी लढत द्यावी लागेल. भारताची दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तसेच 2021 च्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत रौप्यपदक विजेता किदांबी श्रीकांतला या स्पर्धेत विजयी सलामीसाठी झगडावे लागले. कारण चालू वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात सिंधू आणि श्रीकांत हे सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे दिसून येते. विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या गेल्या दोन स्पर्ध्यांमध्ये सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले होते. तर किदांबी श्रीकांतने मलेशिया आणि स्पेनमधील स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. भारताचा आणखी एक बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. थायलंड खुल्या स्पर्धेत लक्ष्य सेनने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. 2021 च्या विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या लक्ष्य सेनचा सलामीचा सामना मलेशियाच्या आठव्या मानांकित ली जियाशी होणार आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्याकडून या स्पर्धेत पुन्हा मोठी अपेक्षा बाळगली जात आहे. या जोडीने अलिकडेच स्वीस खुल्या स्पर्धेत जेतेपद मिळविले आहे. एम. आर. अर्जुन आणि ध्रुव कपिला तसेच महिला दुहेरीत ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपिचंद भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.









