ऑनलाईन टीम/तरुण भारत
इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्तामध्ये (Jakarta) बुधवारी (१९ ऑक्टोबर) इस्लामिक सेंटर मशिदीला भीषण आग लागली. या दुर्घटनेत मशिदीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीनंतर मशिदीवरील भव्य घुमटही कोसळला आहे. यामध्ये मशीद मीनदोस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यात कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती इंडोनेशियातील जकार्ता पोलिसांनी दिली आहे.( Indonesia: Jami mosque of Jakarta catches fire, dome collapses)
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर मशिदीला लागलेली आग इतकी भयानक होती की त्यामुळं मशिदीवरील घुमट पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. काही दिवसांपूर्वीच या मशिदीच्या डागडुजीचं काम सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर ही आग लागली आहे. मशिदीला आग कशामुळं लागली किंवा त्यामागं नेमकी काय कारणं आहेत, याची माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी मशिदीच्या घुमटाचं काम करणाऱ्या कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, इस्लामिक सेंटर परिसरातील मशिदीला आग लागल्यानंतर प्रशासनानं तातडीनं मशिदीतील भाविकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मशिदीतील सर्व लोकांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं असून या दुर्घटनेत मात्र मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळं या घटनेनं इंडोनेशियात खळबळ उडाली आहे.