तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांना मनस्ताप : रेल्वे काय कारवाई करणार?
बेळगाव : हजरत निजामुद्दिन-वास्को एक्स्प्रेसमध्ये स्लीपर डब्यात सामान्य डब्यातील प्रवाशांकडून घुसखोरी करण्यात येत आहे. या एक्स्प्रेसला गर्दी वाढत असून जनरल डब्यात पाय ठेवण्यासही जागा उपलब्ध नसल्याने हे प्रवासी राजरोसपणे आरक्षित डब्यांमध्ये प्रवेश करत असल्याने रेल्वेच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आपला प्रवास सुखकर व्हावा, यासाठी प्रवाशांनी महिनाभरापूर्वी तिकीट आरक्षण केलेले असते. परंतु, रेल्वे तिकीट तपासनीसांचे लक्ष नसल्याने अनारक्षित डब्यातील प्रवासी आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरी करतात. यामुळे तिकीट बुकिंग करूनही प्रवाशांना आसन मिळेलच, याची शाश्वती नाही. तसेच जाब विचारल्यास अंगावर धावून येण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर स्लीपर डब्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये पाय ठेवण्यासही जागा नसल्याचे दिसून येत आहे. ज्या प्रवाशांनी बुकिंग केले आहे ते प्रवासी एका कोपऱ्यामध्ये प्रवास करत आहेत. जर अनारक्षित डब्यातील प्रवाशांना आरक्षित डब्यात प्रवेश द्यायचा असेल तिकीट बुक कशासाठी करायचे? असा प्रश्न प्रवाशांतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हे प्रकार थांबवा अन्यथा तिकिटांचे पैसे परत करा, अशी मागणी केली जात आहे.
रेल्वे विभागाकडे तक्रार
या प्रवासादरम्यानचा एक व्हिडिओ अजित वर्मा नामक एका व्यक्तीने समाज माध्यमांवर टाकून रेल्वे विभागाकडे तक्रारही केली आहे. स्वच्छतागृहास जाण्यासही जागा उपलब्ध नसल्याची तक्रार संबंधित प्रवाशाने रेल्वेकडे केली असून याबाबत रेल्वेकडून कोणती कारवाई केली जाते? हे पहावे लागणार आहे.









