ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे आरपीएफच्या जवानाने अंदाधुंद गोळीबार केला. दहिसर ते मीरारोड स्थानकादरम्यान हा गोळीबाराचा थरार रंगला. या गोळीबारात आरपीएफचे एएसआय टीकाराम मीना यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे दोन आरपीएफ जवानांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने त्यामधील एका जवानाने आपल्या सहकारी जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात आरपीएफचे एएसआय टीकाराम मीना यांच्यासह अन्य तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर काही प्रवाशी जखमी असल्याची माहिती मिळते. पहाटे 5.23 च्या सुमारास मीरारोड ते दहिसरदरम्यान ही घटना घडली. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी बोरिवली येथील भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, चेतन कुमार या आरपीएफ जवानाने हा गोळीबार केला आहे. गोळीबारानंतर चेतन कुमार ट्रेनची ‘चेन पुलिंग’ करुन दहिसरमध्ये उतरला. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो मानसिक तणावाखाली होता की नाही, याची चौकशी सुरु आहे.