गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सध्या मान्सूनच्या पावसाला सुऊवात झालेली आहे. पावसाळी पर्यटनाची आज मोठ्या प्रमाणात ‘क्रेझ’ नव्या पिढीत निर्माण झालेली असल्याने या दिवसात मित्रमंडळींसह धबधब्यांवर वर्षा सहलीला जाणे आणि मद्यपान करून मनसोक्तपणे दंगामस्ती करीत आसुरी आनंद लुटण्याची मानसिकता पाहायला मिळते. आपण जे करतो त्यातून कोणती दुर्घटना उद्भवेल, याचे भान न राखता अशा उपक्रमांत तऊणाई सहभागी होते. एखाद्या धबधब्याच्या माथ्यावरती जाऊन आततायीपणा करणे, एखाद्या डोहाची व्याप्ती न पाहता बेभानपणे उडी मारणे, वाहत्या पाण्याच्या मधोमध शिलाखंडावर उभे राहून सेल्फी काढणे आणि हे करताना शोकांतिकेला निमंत्रण दिले जाईल, याची तमा नसते.
सध्या महाराष्ट्रातल्या रायगड जिह्यातील माणगाव तालुक्यातील देवकुंड धबधब्यासह त्या परिसरातील अन्य प्रेक्षणीय स्थळांवर जाण्यास प्रांताधिकाऱ्याने प्रवेश बंदी दि. 30 सप्टेंबरपर्यंत घातल्याने पर्यटक आणि स्थानिकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मुंबई, पुणे, बेंगलोर अशा महानगरात स्थायिक तऊणाई विकेंडची मौजमजा करण्याच्या नादात अशा वर्षा पर्यटनस्थळी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून धाव घेतात आणि कऊणरित्या मृत्युमुखी पडतात. पावसाळी पर्यटनासाठी माणगाव परिसरातील देवकुंड धबधबा प्रसिद्धीस पावलेला आहे आणि तेथे येण्यासाठी पर्यटकांची पावले आकर्षित होत असतात. आततायीपणे पाण्याचा अंदाज नसताना डोहात पोहणे, मद्यपानाच्या धुंदीत पोहणे, स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नसताना वर्षा पर्यटनास जाणे, यामुळे अशा सहली दरम्यान मृत्यू उद्भवतात.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163 द्वारे संबंधित सरकारी अधिकारी अशी प्रवेशबंदी घालत असतो परंतु स्थानिक आपला रोजगार बुडत असल्याचे दावे करून अशा निर्णयाला विरोध करीत असतात. गोव्यासारख्या सागरी पर्यटनाचे आकर्षण बिंदू ठरलेल्या राज्यात पूर्वी मेपर्यंत पर्यटकांची ये-जा असायची. पण आज पावसाळी धबधबे पाहण्यासाठी देश-विदेशातले पर्यटक येऊ लागल्याने स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याचे दावे केले जातात. परंतु अशा स्थळी पर्यटकांच्या दृष्टीने परिसर कसा सुरक्षित होईल, याविषयी अभावानेच प्रयत्न केले जातात. स्थानिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नाही, लाईफ जॅकेटचा वापर करणे, गाईडला सोबत घेऊन वर्षा सहलीस जाणे अभावाने होते. त्यामुळे दुर्घटनेचे बळी होण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणात उद्भवतात.
गोव्यातील धारबांदोडा तालुक्यातील दूधसागर धबधब्याचे आकर्षण देश -विदेशातल्या पर्यटकांना विलक्षण असून गेल्या पाव शतकात इथे अविवेकी आणि आततायीपणा करणाऱ्या शेकडो पर्यटकांचे दुर्दैवी मृत्यू उद्भवले आहेत. परंतु असे असले तरी वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासंबंधी कायदेकानून यांची थट्टा उडवत सरकारी यंत्रणा अशा उपक्रमांना प्रोत्साहन, स्थानिक रोजगार निर्मितीचे कारण पुढे करून देत असते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वर्षा सहली आयोजित करणारी मंडळी पर्यावरणीय नियमांना वाकुल्या दाखवित असतात आणि त्यामुळे पर्यटक आणि बेशिस्त मंडळींकडून अशा स्थळी केरकचरा, सांडपाणी विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तीन-तेरा वाजलेले पाहायला मिळतात. हणजुणे, साळावली, आमठाणे धरणांच्या जलाशयाच्या प्रतिबंधित परिसरातही हुल्लडबाजी होत असलेली पाहायला मिळत आहे.
2024 मध्ये वर्षा सहलीसाठी लोणावळा जवळील भूशी धरणाजवळ एकाच कुटुंबातील दोन बालकांसह पाच जणांचा कऊणरित्या मृत्यू झाला होता. पाऊस कोसळत असताना आततायीपणा अंगलट येऊन ही शोकांतिका घडली होती परंतु असे असताना अशा दुर्घटनांतून बोध घेतला जात नाही आणि त्यामुळे वर्षा पर्यटनात जास्तीत जास्त शोकांतिका उद्भवत असतात. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यात पसरलेल्या चोर्ला घाटात असंख्य धबधबे असून, इथे अतिउत्साहीपणात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या लक्षणीय अशीच आहे. पट्टेरी वाघ, अस्वल, बिबळा, गवा अशा जंगली श्वापदांसाठी एकेकाळी आश्वासक ठरलेला हा नैसर्गिक अधिवास, अविवेकी पर्यटकांमुळे असुरक्षित ठरलेला आहे. दारू पिऊन, काचेच्या बाटल्या फोडून जंगलात टाकल्याने अस्वल आणि अन्य जंगली श्वापदे गंभीररित्या जखमी होण्याची प्रकरणे उद्भवलेली आहेत. नियम आणि अटींचे पालन न करता तऊणाई बेधडकपणे अभयारण्ये, उद्याने, राखीव जंगलांत बेकायदेशीरपणे प्रवेश करून रिल बनवून अशा नैसर्गिक स्थळांची प्रसिद्धी करीत असल्याने, इथला आततायीपणा झपाट्याने वाढत चाललेला पाहायला मिळतो. आपण काय करतो, याचे भान कोणालाच राहत नसल्याने ही परिस्थिती अनियंत्रित झालेली आहे.
2017 साली कारवारजवळ असलेल्या नागरमाडी धबधब्याच्या परिसरात गोव्यातील पर्यटकांचा एक समूह तेथील भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नसताना गेला असता, सहाजणांचा बुडून मृत्यू झाला होता. ही दुर्घटना घडलेली असताना देखील अशा परिसरात वर्षा पर्यटनाच्या नावाखाली धुडगूस घालणाऱ्या बेशिस्त पर्यटकांना प्रतिबंध घालणे शक्य झालेले नाही. नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेताना आपण वन्यजीवांच्या अधिवासाची दखल घेणे गरजेचे आहे. पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्रात गडबड गोंधळ घालणे कायद्याने प्रतिबंधित असताना देखील अशी मंडळी आततायीपणा करीत असतात आणि दुर्घटनांना निमंत्रण देत असतात. त्यामुळे पावसाळी मोसमात सहली, पदभ्रमण, गिर्यारोहण आदी उपक्रमांचे आयोजन कधी आणि कुठे करावे, याचे भान आयोजकांनी राखले पाहिजे. अन्यथा जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना प्रवेश बंदी करण्यावाचून पर्याय शिल्लक राहणार नाही. पर्यावरणीय पर्यटनाच्या यशस्वीतेसाठी जरी आराखडे आखलेले असले तरी त्यांचे नियोजनबद्ध पालन करण्याची मानसिकता समाजात उभी राहत नसल्याने, वर्षा पर्यटनाचे उपक्रम दुर्घटनांना निमंत्रण देण्यास कारण ठरू लागले आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
– राजेंद्र पां. केरकर








