‘कवितेची सखी-इंदिरा’ कार्यक्रमातून उलगडले आक्कांचे गुणविशेष : इंदिरा संत यांच्या 111 व्या जयंतीचे बुलकतर्फे आयोजन
बेळगाव : इंदिरा संत यांच्या कवितांतून आक्रमकता नाही, तिचा सूर आत्मगत आहे. मीरेच्या एकतारीच्या सुरांसारखा तो सुक्ष्मपणे झंकारत असतो. त्यांच्या कवितांमध्ये सूक्ष्मनाट्या आहे. हे नाट्या ‘कवितेची सखी : इंदिरा’ कार्यक्रमातून अलगद उलगडले गेले. इंदिरा संत यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त वरेरकर नाट्या संघामध्ये बुलकतर्फे हा कार्यक्रम झाला. यामध्ये लेखिका मेधा मराठे, शोभा कुलकर्णी, आसावरी व वीणा संत, स्वाती कुलकर्णी यांचा सहभाग होता.
मेधा मराठे यांनी नेहमीच्या बोलण्यातील संवादात्मक भाषा वापरून नाट्यामय व मुक्त छंदातील कविता सादर केल्या. सहसा या कविता सादर झालेल्या नसल्याने श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. ‘उगीचच हो’, ‘एकटे’, ‘सर्वस्वाधार’, ‘जाताजाता’, या कवितांचे दृष्यात्मक नाट्या श्रोत्यांसमोर उलगडले गेले. वीणा संत यांनी इंदिराबाईंच्या घरगुती आठवणी रंजकपणे सांगितल्या.
घरातील नाती कटाक्षाने जपणे, लहान गोष्टींमधून सौंदर्य टिपणे ते कवितेच्या माध्यमातून उलगडणे तसेच रोजच्या आयुष्यातील घटनांमध्ये निसर्ग प्रतिमा पाहणे हे आक्कांचे गुणविशेष वीणा संत यांनी सहजपणे श्रोत्यांसमोर उलगडले. ना. मा. संत व इंदिरा संत यांच्या सहजीवनाचे सुंदर प्रतीक असलेला प्रसंग त्यांनी कथन केला. त्यांचे कथन श्रोत्यांना भावले.
आक्कांच्या इंग्रजी अनुवादित कविता फारशा सादर झाल्या नाहीत. त्यापैकी ‘हाऊसहोल्ड फायर्स’, ‘मीच बुडविले’, ‘कृतघ्न’, ‘कात’ अशा कविता स्वाती कुलकर्णी, आसावरी संत व वीणा संत यांनी प्रथम मराठीमध्ये व त्यानंतर इंग्रजीमध्ये त्या त्या कवितेतील भाव अनुलक्षून सादर केल्या. शोभा कुलकर्णी यांनी स्वत: अनुवादित केलेल्या आक्कांच्या इन्क्लिनेशन’,‘वंडरिंग सनसेट’,‘स्लाईड’ कवितांचे सादरीकरण केले.
इंदिरा संत यांच्या कविता गेय आहेत, त्या समाजभान जपणाऱ्याही आहेत. स्वत:बरोबर इतरांचे विशेषत: स्त्रियांचे दु:ख एकटेपण सोसणं त्या उत्कटपणे मांडतात, याचा अनुभव श्रोत्यांनी घेतला. पाच जणींनी वेगवेगळ्या भावांच्या, अर्थाच्या, रचनेच्या कविता सादर करूनही त्यात एक सुसूत्रतता होती. इंग्रजी अनुवाद करताना कवींनी त्या कवितांमधील मूळ भावभावना लक्षात घेऊन उत्तम शब्दरचना केली होती. त्यामुळे कविता इंदिरा संत यांची जशी सखी होती तशीच ती श्रोत्यांचीही झाली, अशी भावना रसिकांनी व्यक्त केली.









