बेळगाव : काँग्रेस सरकारने गोरगरीब जनतेला आधार ठरलेल्या इंदिरा कॅन्टीनमध्ये भाजी व भाकरी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे शहरातील इंदिरा कॅन्टीन भाजी-भाकरीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे. अनुदानाअभावी मध्यंतरी इंदिरा कॅन्टीनला उतरती कळा लागली होती. मात्र राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच इंदिरा कॅन्टीनना पुन्हा उर्जितावस्था प्राप्त झाली आहे. गोरगरिबांना आहार मिळावा यासाठी केवळ दहा रुपयांत जेवण आणि 5 रुपयांत नाष्टा उपलब्ध करून दिला जातो. मात्र अनुदानाअभावी शहरातील काही इंदिरा कॅन्टीनना प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे. तर काही कॅन्टीन सुरळीत सुरू आहेत.
शहरात बसस्थानक रोड, क्लब रोड, सदाशिवनगर, गोवावेस आदी ठिकाणी इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आली आहेत. मात्र अद्यापही काही इंदिरा कॅन्टीनमध्ये सुरळीत जेवण आणि नाष्टा मिळत नसल्याने नागरिकांनी पाठ फिरविली आहे. तर काही कॅन्टीनमध्ये दर्जेदार आहार मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. दरम्यान इंदिरा कॅन्टीनचा दर्जा वाढविण्यासाठी सरकारने आहारात भाजी व भाकरी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अद्यापही तो कागदावरच असल्याने गोरगरिबांना केवळ भातावर समाधान मानावे लागत आहे.
इंदिरा कॅन्टीनना चांगले दिवस
कोरोनाकाळात बहुतांशी इंदिरा कॅन्टीन बंद होती. त्यामुळे गोरगरीब, कष्टकरी आणि दीनदुबळ्यांचे हाल झाले होते. काँग्रेस सरकारच्या काळात इंदिरा कॅन्टीन सुरू करण्यात आली होती. मात्र भाजप सत्तेवर येताच याकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे इंदिरा कॅन्टीन ओस पडली होती. मात्र पुन्हा काँग्रेस सरकार सत्तेवर येताच इंदिरा कॅन्टीनना चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे काही कॅन्टीनना नागरिकांचा प्रतिसादही वाढू लागला आहे. लाभ घेणाऱ्या नागरिकांना आता भाजी-भाकरीची प्रतीक्षा लागली आहे.









