तिमाहीत 2,161 कोटी रुपयांचा नफा: महसूल वाढला
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो चालवणारी कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 2,161 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. ही वार्षिक आधारावर 21 टक्क्यांनी घट आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ती 2,726 कोटी रुपये होती. एप्रिल-जून तिमाहीत इंडिगोचा कामकाजातून मिळणारा महसूल वर्षाच्या आधारावर 5 टक्क्यांनी वाढून 20,496 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत म्हणजेच आर्थिक वर्ष 25 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 19,570 कोटी रुपये होता. इंडिगोने बुधवारी एप्रिल-जून तिमाही आणि वार्षिक निकाल जाहीर केले.
समभागाची कामगिरी
इंडिगोचे शेअर्स 0.67 टक्क्यांनी घसरून 5,718 रुपयांवर बंद झाले. कंपनीचा शेअर एका महिन्यात 4 टक्के घसरला आणि 6 महिन्यांत 35 टक्के वाढला. एका वर्षात कंपनीचा शेअर 28 टक्क्यांनी वाढला आहे. इंडिगोचे बाजारमूल्य 2.21 लाख कोटी रुपये आहे.
एप्रिलमध्ये इंडिगो जगातील सर्वात मौल्यवान
एप्रिलमध्ये, इंडिगो बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील सर्वात मौल्यवान एअरलाइन बनली. ब्लूमबर्गच्या मते, इंडिगोने 9 एप्रिल रोजी हे स्थान मिळवले आणि अमेरिकेतील डेल्टा एअरलाइन्सला थोडक्यात मागे टाकले.









