खराब हवामानाचा फटका : अमृतसरहून उड्डाण : 31 मिनिटांनी परतले भारतीय हद्दीत
वृत्तसंस्था/ अमृतसर
पंजाबमधील अमृतसर विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर इंडिगोचे विमान खराब हवामानामुळे पाकिस्तानी हद्दीत पोहोचल्याचा प्रकार उघड झाला आहे. अमृतसरहून अहमदाबादला जाणारे फ्लाईट क्रमांक 6-ई-645 हे इंडिगोचे विमान सुमारे 31 मिनिटे पाकिस्तानी हवाई हद्दीत राहिले. नियंत्रण कक्षाशी सुसंगत राहिल्यामुळे ते थोड्या वेळाने सुरक्षित भारतीय हवाई हद्दीत परतले. खराब हवामानामुळे हा प्रकार घडला असून आंतरराष्ट्रीय नियमांमुळे पाकिस्तानला योग्य सहकार्य करावे लागले.
इंडिगोचे विमान शनिवारी रात्री भारतीय वेळेनुसार 8.01 मिनिटांनी अमृतसर विमानतळावरून अहमदाबादकडे निघाले होते. मात्र काही मिनिटांतच खराब हवामान आणि वाऱ्यामुळे विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीत जावे लागले. पाकिस्तान नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार हे विमान लाहोरजवळ पाकिस्तानमध्ये भरकटत गुजरानवाला येथे पोहोचले. पाकिस्तान फ्लाईट रडारनुसार, इंडिगो विमान 454 नॉट्सच्या वेगाने लाहोरच्या उत्तरेकडे दाखल झाल्यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर भारतीय हद्दीत परतले. स्थानिक माध्यमांनी रविवारी ही माहिती दिली असली तरी विमान कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
चार वर्षांपूर्वी पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली होती. तेव्हापासून आजतागायत भारत पाकिस्तानची हवाई हद्द वापरत नाही. पण आपत्कालीन परिस्थितीत पाकिस्तानला आपली हवाई जागा द्यावी लागली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार खराब हवामानाच्या परिस्थितीत कोणताही देश आपली हवाई जागा देण्यास नकार देऊ शकत नाही.
यापूर्वी मे महिन्यात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे (पीआयए) एक विमान भारतीय हवाई हद्दीत घुसले होते. पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे सुमारे 10 मिनिटे सदर विमान भारतीय हद्दीत होते. पीके-248 हे विमान 4 मे रोजी मस्कतहून परतत असताना लाहोरच्या अल्लामा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मुसळधार पावसामुळे पायलटला बोईंग 777 विमान उतरवणे कठीण झाले होते.









