वृत्तसंस्था/ कराची
इंडिगोच्या विमानाचे शनिवारी पाकिस्तानातील कराचीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हे विमान नवी दिल्लीहून टेकऑफ होऊन सौदी अरेबियातील जेद्दाह येथे जाणार होते. मात्र, सौदी अरेबियाच्या दिशेने मार्गस्थ झाल्यानंतर आपत्कालीन स्थितीमुळे पाकिस्तानातील कराची येथे उतरवावे लागले. हे विमान कराचीतील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या (सीसीए) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पुरुष प्रवासी गंभीर आजारी पडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आजारी पडलेल्या भारतीय प्रवाशाचे वय 55 वर्षे होते. त्याला ऑक्सिजन दिल्यानंतरही प्रवाशाच्या तब्येतीत सुधारणा न झाल्यामुळे कराची विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून विमान उतरवण्यात आले. एअर ट्रॅफिक कंट्रोलने इंडिगो विमानाला मानवतावादी कारणास्तव कराचीमध्ये उतरण्याची परवानगी दिल्यानंतर प्रवाशाच्या आपत्कालीन उपचारांसाठी वैद्यकीय पथक विमानात पोहोचले होते.









