वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईन्सला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘डीजीसीए’ने एअरलाईनला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. प्रशिक्षण, अभियांत्रिकी प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमधील प्रणालीगत त्रुटींसाठी इंडिगोला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘डीजीसीए’ने इंडिगो एअरलाईन्सचे विशेष ऑडिट केले. ऑडिटने ए-321 च्या ऑपरेशन्स, प्रशिक्षण, अभियांत्रिकी आणि फ्लाईट डेटा मॉनिटरिंग प्रोग्रामवरील त्यांच्या दस्तऐवजीकरण आणि प्रक्रियांचे पुनरावलोकन केले. विशेष लेखापरीक्षणादरम्यान इंडिगो एअरलाईन्सच्या ऑपरेशन्स, प्रशिक्षण प्रक्रिया आणि अभियांत्रिकी प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांमध्ये काही कमतरता लक्षात आल्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.









