खराब हवामानाचा फटका : अमृतसरमध्ये इमर्जन्सी लँडिंग
वृत्तसंस्था /अमृतसर
इंडिगोचे श्रीनगर-जम्मू विमान 6ई-2124 खराब हवामानामुळे रविवारी दोनदा पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसले. यानंतर विमानाचे अमृतसरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. इंडिगो विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्याची पंधरवड्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 10 जून रोजी असा प्रकार उघडकीस आला होता. ताजी घटना रविवारी दुपारी इंडिगो फ्लाईट क्रमांक 6ई-2124 च्या संदर्भात घडली आहे. सदर विमानाने श्रीनगरहून जम्मूसाठी उ•ाण केले. 28 मिनिटांनंतर खराब हवामानामुळे विमान जम्मू-काश्मीरमधील कोटे जमील मार्गे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत पोहोचले. हे उ•ाण सुमारे 5 मिनिटे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात राहून सियालकोटमार्गे जम्मूच्या दिशेने निघाले. मात्र, जम्मूमध्येही खराब हवामान असल्यामुळे ते तेथेही उतरू शकले नाही. यानंतर विमान अमृतसरच्या दिशेने रवाना करण्यात आले. याचदरम्यान दुपारी सव्वाचारच्या सुमारास हे विमान पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले. जम्मू-काश्मीरच्या कडियाल कलानमध्ये दाखल झालेले हे विमान दुपारी 4.25 च्या सुमारास अमृतसरमधील अजनाला येथील कक्कड गावाजवळ परतल्यानंतर अमृतसरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.









