डीआरडीओकडून तयारी : भारताच्या सामर्थ्यात होणार वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आगामी काळात 2028-29 पर्यंत दीर्घ पल्ल्याची हवाई सुरक्षा यंत्रणा सक्रीय स्वरुपात तैनात करण्याची योजना आखत आहे. ही सुरक्षा यंत्रणा 350 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून येणारी स्टील्थ फायटर्स, विमाने, ड्रोन, क्रूज क्षेपणास्त्रs आणि अचूक निर्देशित शस्त्रास्त्रांचा शोध घेत त्यांना नष्ट करण्याची क्षमता बाळगणारी असणार आहे.
प्रोजेक्ट कुशा अंतर्गत डीआरडीओ स्वदेशी दीर्घ पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र (एलएम-एसएएम) यंत्रणा विकसित करत आहे. हा प्रकल्प इंटरसेप्शन कॅपिबिलिटीशी संबंधित आहे. रशियन एस-400 ट्रायम्फ हवाई सुरक्षा यंत्रणेप्रमाणेच ही स्वदेशी यंत्रणा असणार आहे.
मे 2022 मध्ये सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीकडून ‘मिशन मोड’ प्रकल्पाच्या स्वरुपात एलआर-एसएएम प्रणालीच्या विकासाला मंजुरी देण्यात आल्यावर संरक्षण मंत्रालयाने मागील महिन्यात 21,700 कोटी रुपये खर्चुन भारतीय वायुदलासाठी याच्या 5 स्क्वाड्रन्सच्या खरेदीला मंजुरी दिली होती. दीर्घ पल्ल्याच्या मोबाइल एलआर-एसएएममध्ये विविध प्रकारची इंटरसेप्टर क्षेपणास्त्रs असतील, जी 150 किमी, 250 किमी आणि 350 किमीच्या अंतरावरील शत्रूला नष्ट करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली आहेत.
या यंत्रणेचा मुख्य उद्देश रणनीतिक आणि सामरिक स्वरुपात कमजोर क्षेत्रांना व्यापक हवाई सुरक्षा प्रदान करणे आहे. ही यंत्रणा अत्याधिक वेगाच्या लक्ष्यांच्या विरोधातही प्रभावी असणार आहे. 250 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांना नष्ट करण्याच्या दृष्टीकोनातून ही यंत्रणा तयार केली जाणार असल्याचे डीआरडीओकडून सांगण्यात आले.









