वृत्तसंस्था/ रोजारिओ, अर्जेंटिना
भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने एका गोलची पिछाडी भरून काढत चिलीवर मात करून चौरंगी हॉकी स्पर्धेची विजयी सुरुवात केली.
भारतीय महिलांनी चिलीचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. सुखवीर कौरने 39 व्या तर कनिका सिवाचने 58 व्या मिनिटाला भारताचे गोल नोंदवले. चिलीचा एकमेव गोल जवेरिया साएन्झने 20 व्या मिनिटाला नोंदवला. चिलीनेच या सामन्यात सर्वप्रथम गोल करीत भारतावर आघाडी घेतली होती. तिसऱ्या सत्रातील खेळात भारताने बरोबरी साधण्यात यश मिळविले. सुखवीरने हा गोल केला. सामना संपण्यास दोन मिनिटे असताना कनिकाने भारताचा दुसरा व निर्णायक गोल करीत संघाचा विजय साकार केला. भारताची पुढील लढत उरुग्वेविरुद्ध होणार आहे.









