डकवर्थ- लेविस नियमानुसार भारत 2 धावानी विजयी, सामनावीर जसप्रित बुमराह
वृत्तसंस्था/ डब्लीन
यजमान आयर्लंड आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत शुक्रवारी पहिल्या सामन्यात भारताने डकवर्थ -लेविस नियमाच्या आधारे आयर्लंडचा 2 धावानी पराभव करत विजयी सलामी दिली. या मालिकेत पहिल्यांदाच कर्णधारपद भूषविणाऱ्या जसप्रित बुमराहने पदार्पणातच भारताला विजय मिळवून दिला आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळविला जाणार आहे.
या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी दिली. आयर्लंडने 20 षटकात 7 बाद 139 धावा जमविल्या. आयर्लंड संघातील मॅकेर्थीने नाबाद अर्धशतक झळकविताना 33 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 51 धावांचे योगदान दिले. कर्णधार बुमराह, प्रसिध्द कृष्णा आणि बिस्नोई यांच्या अचुक गोलंदाजीसमोर आयर्लंडची स्थिती 10.3 षटकात 6 बाद 59 अशी केविलवाणी होती. त्यानंतर कॅम्फर आणि मॅकेर्थी याने 7 व्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केल्याने आयर्लंडला 139 धावापर्यंत मजल मारता आली. कॅम्फरने 33 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 39 तर अॅडेरने 16 चेंडूत 2 चौकारांसह 16, कर्णधार स्टर्लिंगने 11 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. टेक्टरने 1 चौकारसह 9 धावा केल्या. आयर्लंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 30 धावा जमविताना 4 गडी गमविले. आयर्लंडचे अर्धशतक 54 चेंडूत, शतक 97 चेंडूत फलकावर लागले. मॅकेर्थीने 33 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक झळकविले. आयर्लंडच्या डावात 5 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे बुमराह, प्रसिध्द कृष्णा आणि रवी बिस्नोई यांनी प्रत्येकी 2 तर अर्शदीप सिंगने 1 गडीबाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावाला जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड याने दमदार सुरूवात करून दिली. या जोडीने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 45 धावा झोडपल्या. डावातील सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जैस्वाल यंगच्या गोलंदाजीवर कर्णधार स्टर्लींगकरवी झेलबाद झाला. त्याने 23 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 24 धावा जमविल्या. यंगने आपल्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माला खाते उघड्यापूर्वीच टकेरकरवी झेलबाद केले. 6.5 षटकात भारताने 2 बाद 47 धावा जमविल्या असताना पावसाला प्रारंभ झाल्याने पंचानी खेळ थांबविला. काहीवेळ वाट पाहून पंचानी डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे भारताला विजयी म्हणून घोषित केले. गायकवाडने 16 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 19 तर सॅमसनने नाबाद 1 धावा केली. भारताच्या डावात 2 षटकार आणि 4 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे यंगने 2 धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक :
आयर्लंड : 20 षटकात 7 बाद 139 (मॅकेर्थी 33 चेंडूत 4 षटकार, 4 चौकारासह नाबाद 51, कॅम्फर 33 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 39, अॅडेर 16 चेंडूत 2 चौकारांसह 16, स्टर्लिंग 11 चेंडूत 1 चौकारासह 11, टेक्टर 1 चौकारासह 9, अवांतर 7, बुमराह 2-24, प्रसिध्द कृष्णा 2-32, बिस्नोई 2-23, अर्शदीप सिंग 1-35), भारत : 6. 5 षटकात 2 बाद 47 (जैस्वाल 23 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 24, गायकवाड 16 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 19, तिलक वर्मा 0, सॅमसन नाबाद 1, अवांतर 3, यंग 2-2).









