आयर्लंडवर 33 धावांनी मात, ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक, रिंकू सिंग सामनावीर, बालबर्नीचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ डब्लिन
आयर्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने रविवारी यजमान आयर्लंडचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभव करून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताने हा दुसरा सामना 33 धावांनी जिंकला. 21 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 38 धावा जमवणाऱ्या रिंकू सिंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक झळकवले.
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 5 बाद 185 धावा जमवल्या. त्यानंतर आयर्लंडने 20 षटकात 8 बाद 152 धावापर्यंत मजल मारली.
भारताच्या डावामध्ये सलामीच्या गायकवाडने 43 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 58 धावा जमवताना जैस्वालसमवेत 22 चेंडूत 29 धावांची भागीदारी केली. जैस्वालने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 18 धावा जमवल्या. तिलक वर्मा केवळ एका धावेवर बाद झाला. संजू सॅमसन आणि रिंकू सिंग यांनी तिसऱ्या गड्यासाठी 49 चेंडूत 71 धावांची भागीदारी केली. सॅमसनने 26 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 40 धावा जमवल्या. गायकवाड चौथ्या गड्याच्या रुपात बाद झाला. रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांनी पाचव्या गड्यासाठी 55 धावांची भागीदारी केल्याने भारताला 185 धावापर्यंत मजल मारता आली. रिंकू सिंगने 21 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 38 तर शिवम दुबेने 16 चेंडूत 2 षटकारासह नाबाद 22 धावा जमवल्या. भारताच्या डावात 8 षटकार आणि 15 चौकार नोंदवले गेले. आयर्लंडतर्फे मॅकर्थीने 2 तर अॅडेर, यंग आणि व्हाईट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताच्या डावात पॉवर प्लेच्या 6 षटकात 47 धावा जमवताना 2 गडी बाद झाले. भारताचे पहिले अर्धशतक 40 चेंडूत, शतक 67 चेंडूत तर दीडशतक 111 चेंडूत नोंदवले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावामध्ये सलामीच्या बालबर्नीने 51 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारासह 72, मार्क अॅडेरने 15 चेंडूत 3 षटकारासह 23, कॅम्फरने 17 चेंडूत 1 षटकारासह 18, डॉकरेलने 11 चेंडूत 1 षटकारासह 13 धावा जमवल्या. भारताची गोलंदाजी मात्र शिस्तबद्ध नव्हती. भारतीय गोलंदाजांनी 11 चेंडू वाईड टाकले. आयर्लंडला अवांतराच्या रुपात 16 धावा मिळाल्या. आयर्लंडच्या डावात 9 षटकार आणि 6 चौकार नोंदवले गेले. आयर्लंडने पॉवर प्लेच्या 6 षटकात 31 धावा जमवताना 3 गडी गमवले. आयर्लंडचे अर्धशतक 48 चेंडूत तर शतक 83 चेंडूत तसेच दीडशतक 120 चेंडूत फलकावर लागले. बालबर्नीने 39 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह अर्धशतक झळकवले. भारतातर्फे बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन तर अर्शदीप सिंगने एक गडी बाद केला. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना औपचारिकच राहिल.
संक्षिप्त धावफलक : भारत 20 षटकात 5 बाद 185 (गायकवाड 43 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 58, सॅमसन 26 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 40, रिंकू सिंग 21 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह 38, दुबे 16 चेंडूत 2 षटकारासह नाबाद 22, जैस्वाल 1 षटकार आणि 2 चौकारासह 18, अवांतर 8, मॅकर्थी 2-36, अॅडेर, यंग, व्हाईट प्रत्येकी एक बळी).
आयर्लंड 20 षटकात 8 बाद 152 ( बालबर्नी 51 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारासह 72, कॅम्फर 1 षटकारासह 18, डॉकरेल 1 षटकारासह 13, अॅडेर 3 षटकारासह 23, अवांतर 16, बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, रवि बिश्नोई प्रत्येकी दोन बळी, अर्शदीप सिंग 1-29).









