दुसरा वनडे सामना : लंकेवर 4 गडय़ांनी मात, केएल राहुलचे नाबाद अर्धशतक, सामनावीर कुलदीपचे 3 बळी, फर्नांडोचे अर्धशतक वाया

वृत्तसंस्था /कोलकाता
केएल राहुलने नोंदवलेले नाबाद अर्धशतक, वेगवान गोलंदाज मोहमद सिराज तसेच उमरान मलिक, फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने येथे झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात लंकेवर 4 गडय़ांनी विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 51 धावांत 3 बळी मिळविणाऱया कुलदीप यादवला सामनावीराचा बहुमान मिळाला. या मालिकेतील तिसरा व शेवटचा वनडे सामना रविवारी 15 रोजी तिरुवनंतपूरम येथे होणार आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱया लंकेचा डाव 39.4 षटकात 215 धावात गुंडाळल्यानंतर भारताने 43.2 षटकांत 6 बाद 219 धावा जमवित विजय साकार केला. माफक आव्हानाचा पाठलाग करताना रोहित व गिल यांनी भारताला जलद सुरुवात करून दिली. पण दोघेही फार वेळ टिकले नाहीत. रोहित 17 धावा काढून बाद झाल्यानंतर गिल 21 धावांवर झेलबाद झाला. पहिल्या सामन्यातील शतकवीर कोहलीदेखील स्वस्तात (4) बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने चांगली सुरुवात करूनही 28 धावांवर बाद झाल्यावर भारताची स्थिती 4 बाद 86 अशी झाली.
50 वा वनडे सामना खेळणारा केएल राहुल व उपकर्णधार हार्दिक पंडय़ाने डाव सावरताना सावध फलंदाजी केली. या दोघांनी पाचव्या गडय़ासाठी 75 धावांची भागीदारी करीत संघाला विजयासमीप आणले. हार्दिक 53 चेंडूत 36 धावांवर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. अक्षर पटेलने फटकेबाजी करीत 21 चेंडूत 21 धावा केल्या. त्यात 1 चौकार, 1 षटकाराचा समावेश होता. राहुलसमवेत त्याने 30 धावांची भर घातली. राहुलने नंतर कुलदीपसमवेत 44 व्या षटकात विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. कुलदीप 10 धावांवर नाबाद राहिला तर राहुलने 103 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 64 धावा जमविल्या. लंकेतर्फे लाहिरु कुमारा व चमिक करुणारत्ने यांनी प्रत्येकी 2, रजिता, धनंजय डिसिल्वा यांनी एकेक बळी टिपला.
फर्नांडोचे पदार्पणात अर्धशतक
लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया नुवांदू फर्नांडोने चिवट आणि समयोचित फलंदाजी करत अर्धशतक झळकविले. आविष्का फर्नांडो आणि नुवांदू फर्नांडो या सलामीच्या जोडीने 6 षटकात 29 धावा जमवल्या. मोहमद सिराजच्या अप्रतिम इनस्विंगरवर आविष्का फर्नांडोचा त्रिफळा उडाला. त्याने 17 चेंडूत 4 चौकारासह 20 धावा जमवल्या. आविष्का फर्नांडो बाद झाल्यानंतर कुशल मेंडिस आणि नुवांदू फर्नांडो यांनी दुसऱया गडय़ासाठी 10 षटकात 73 धावांची भागीदारी केली. कुलदीप यादवने कुशल मेंडिसला 17 व्या षटकात पायचित केले. त्याने 34 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 34 धावा जमवल्या. दुसऱया बाजूने फिरकी गोलंदाजी करणारा अक्षर पटेलने धनंजय डिसिल्वाचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडवला. नंतर चोरटी धाव घेण्याच्या नादात नुवांदू फर्नांडो गिलच्या अचूक फेकीवर धावचित झाला. त्याने 63 चेंडूत 6 चौकारासह 50 धावा केल्या. कुलदीप यादवने कर्णधार शनाकाचा 2 धावावर त्रिफळा उडवला. न्यूझीलंडचा निम्मा संघ 22.5 षटकात 125 धावात तंबूत परतला होता.
कुलदीपने यानंतर स्वतःच्या गोलंदाजीवर असालंकाला टिपले. त्याने 1 चौकारासह 15 धावा जमवल्या. हसरंगा आणि वेलालगे या जोडीने सातव्या गडय़ासाठी 26 धावांची भर घातली. उमरान मलिकने हसरंगाला पटेलकरवी झेलबाद केले. त्याने 17 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 21 धावा जमवल्या. उमरान मलिकने चमिका करुणारत्नेला पटेलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 25 चेंडूत 3 चौकारासह 17 धावा जमवल्या. वेलालगेने 34 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 32 धावा जमवल्या. लंकेला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. वेलालगे मोहमद सिराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. लंकेच्या डावातील 39 व्या षटकात मोहमद सिराजने दुसऱया आणि चौथ्या चेंडूवर लंकेचे दोन फलंदाज बाद केले. सिराजने कुमाराला खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचित करून लंकेला 39.4 षटकात 215 धावावर रोखले. लंकेच्या डावामध्ये 3 षटकार आणि 26 चौकार नोंदवले गेले. भारतातर्फे मोहमद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 तर उमरान मलिकने 2 तसेच अक्षर पटेलने एक गडी बाद केला. शमीला मात्र एकही गडी बाद करता आला नाही. भारताच्या मोहमद सिराजने पॉवर प्ले च्या कालावधीत नवा चेंडू उत्तमपणे हाताळला. पहिल्या 10 षटकाअखेर लंकेने 1 बाद 51 धावापर्यंत मजल मारली होती.
संक्षिप्त धावफलक
लंका 39.4 षटकात सर्वबाद 215 (आविष्का फर्नांडो 20, नुवांदू फर्नांडो 50, कुशल मेंडिस 34, चरिथ असालंका 15, शनाका 2, हसरंगा 21, विलालगे 32, करुणारत्ने 17, रजिता नाबाद 17, मोहमद सिराज 3-30, उमरान मलिक 2-48, कुलदीप यादव 3-51, अक्षर पटेल 1-16). भारत 43.2 षटकांत 6 बाद 219 : रोहित शर्मा 17 (21 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), गिल 21 (12 चेंडूत 5 चौकार), कोहली 4, श्रेयस अय्यर 28 (33 चेंडूत 5 चौकार), केएल राहुल नाबाद 64 (103 चेंडूत 6 चौकार), हार्दिक पंडय़ा 36 (53 चेंडूत 4 चौकार), अक्षर पटेल 21 (21 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), कुलदीप यादव नाबाद 10 (10 चेंडूत 2 चौकार), अवांतर 18. गोलंदाजी ः लाहिरु कुमारा 2-64, करुणारत्ने 2-51, डिसिल्वा 1-9, हसरंगा 0-28.









