वृत्तसंस्था/ पर्थ
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला पाच सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेत एकतर्फी हार पत्करावी लागली. यजमान ऑस्ट्रेलियाने या मालिकेत भारताचा 5-0 असा दणदणीत पराभव केला. या मालिकेतील शनिवारी झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावर 3-2 अशा गोलफरकाने विजय मिळवला.
या हॉकी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5-1, दुसऱ्या सामन्यात 4-2, तिसऱ्या 2-1, चौथ्या सामन्यात 3-1 तर शनिवारच्या शेवटच्या सामन्यात 3-2 असा पराभव केला. या एकतर्फी पराभवामुळे भारतीय पुरुष हॉकी संघावर आगामी पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी चांगलेच दडपण आल्याचे जाणवते.
शनिवारच्या शेवटच्या सामन्यात भारतातर्पे कर्णधार हरमनप्रित सिंगने चौथ्या मिनिटाला, बॉबीसिंग धामीने 53 व्या मिनिटाला गोल नोंदवले. ऑस्ट्रेलियातर्फे जेरेमी हेवर्डने 20 व्या मिनिटाला, विलॉटने 38 व्या मिनिटाला तर टीम ब्रँडने 39 व्या मिनिटाला गोल नोंदवले. या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने पेनल्टी कॉर्नरच्या अनेक संधी वाया घालवल्या. त्याचप्रमाणे भारताच्या बचावफळीची कामगिरी दर्जेदार न झाल्याने ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणे अधिक सोपे गेले. भारतीय हॉकी संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीमुळे आता हॉकी इंडियाला संघाच्या सुधारित कामगिरीसाठी अधिक लक्ष द्यावे लागेल.









