वृत्तसंस्था/बेकेनहॅम (केंट)
भारताच्या वरिष्ठ संघाचा भारत ‘अ’ संघाविरुद्धचा चार दिवसीय सराव सामना आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असून त्यात दोन्ही डावखुरे गोलंदाज मैदानात उतरतील तेव्हा कुलदीप यादव रवींद्र जडेजाशी जोरदार स्पर्धा करण्याचा प्रयत्न करेल. 20 जूनपासून हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविऊद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी हा सामना वरिष्ठ संघाचा एकमेव सराव सामना असेल. संघांतर्गतचा हा सामना कसोटी सामन्याच्या तयारीच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने युरोपियन फुटबॉल क्लबमध्ये दीर्घकाळापासून चालत आलेल्या पद्धतीचे अनुकरण करून विरोधी संघाला रणनीतिक आघाडीवर कोणताही सुगावा लागू नये यासाठी बंद दाराआड धोरणे ठरविण्याचा मार्ग निवडला आहे.
या वर्षाच्या सुऊवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी असेच केले होते.Nगोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल याने बुधवारी सांगितले की, दररोज 90 षटके गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्टॅमिना तयार करणे हे जाळ्यातील सामान्य सराव सत्रांपेक्षा खूप वेगळे आहे. चार दिवसांच्या या सामन्याला अधिकृत प्रथम श्रेणीचा दर्जा नाही, त्यामुळे जर कोणी स्वस्तात बाद झाला, तरी त्याला दुसरी सधी मिळेल. चार दिवसांत 360 षटके टाकावी लागणार असल्याने संघ व्यवस्थापनाला गोलंदाजी विभागाची नीट पारख करता येईल. गोलंदाजांना, मग तो फिरकी गोलंदाज असो वा वेगवान गोलंदाज, प्रत्यक्ष सामन्यात आवश्यक लय मिळवण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. गंभीरला हेडिंग्लेवर एकमेव फिरकी गोलंदाजाला संधी देण्याच्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल. संघाकडे रवींद्र जडेजा उपलब्ध असून त्याची उत्कृष्ट फलंदाजी ‘सेना’ देशांमध्ये एक मोठा अनुकूल घटक बनते.
परंतु जर भारताला 20 बळी मिळविण्याची अपेक्षा असेल, तर कुलदीप यादवची बहुमुखी प्रतिभा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अधिक चांगल्या प्रकारे पूरक ठरू शकते जडेजा व कुलदीप यापैकी कुणाला संधी द्यायची हे सर्वांत मोठे कोडे असून ते गंभीर आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना सोडवावे लागेल. त्याचप्रमाणे संघांतर्गत सामन्यामुळे प्रशिक्षक आणि कर्णधार शुभमन गिल यांना या परिस्थितीत आकाश दीप अधिक प्रभावी ठरतो की प्रसिद्ध कृष्णा हे पाहण्याची संधी मिळेल. सहा महिन्यांनंतर कसोटी सामना खेळणाऱ्या बुमराहला अनेक स्पेल गोलंदाजी करण्याची आणि त्याच्या तंदुऊस्तीची चाचणी घेण्याची संधी यानिमित्ताने मिळेल. तो दुखापतीतून सावरून पुनरागमन केल्यानंतर फक्त आयपीएल खेळलेला आहे.









