वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या पहिल्या महिला स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज निवृत्त झाल्या आहेत. 2 ऑगस्ट 2022 रोजी कंबोज या न्यूयॉकमध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी झाल्या होत्या. कंबोज या 35 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाल्या आहेत. यादरम्यान त्यांनी भूतान, दक्षिण आफ्रिका आणि युनेस्कोमध्ये भारतीय राजदूत म्हणून काम केले आहे.
रुचिरा कंबोज या 1987 च्या तुकडीच्या आयएफएस अधिकारी आहेत. असाधारण वर्षे आणि अविस्मरणीय अनुभवांसाठी भारताचे आभार असे त्यांनी सोशल मीडियावर नमूद केले आहे. मागील दोन वर्षांमध्ये रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास युद्धादरम्यान कंबोज यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील चर्चांमध्ये भारताचे नेतृत्व केले.
रुचिरा कंबोज 1987 च्या नागरी सेवा परीक्षेत देशात महिलांमध्ये अव्वल राहिल्या होत्या. तर विदेश सेवा परीक्षेतही त्या अव्वल ठरल्या होत्या. कंबोज यांनी हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच या तीन भाषा अवगत आहेत. 1989-91 पर्यंत फ्रान्समध्ये भारतीय दूतावासात तृतीय सचिव म्हणून त्यांनी स्वत:च्या कूटनीतिक कारकीर्दीची सुरुवात केली होती. 2002-05 पर्यंत त्या संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी मिशनमध्ये कौन्सिलर राहिल्या, जेथे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ शांतता मिशन, सुरक्षा परिषद सुधारणा, मध्यपूर्व संकट इत्यादी अनेक राजनयिक मुद्द्यांना हाताळले आहे.
कंबोज यांनी लंडन येथील राष्ट्रकुल सचिवालयात महासचिव कार्यालयाच्या उपप्रमुख म्हणून काम केले आहे. 2011-14 पर्यंत त्या भारताच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल राहिल्या. आतापर्यंत हे पद सांभाळणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला आहेत. कंबोज यांनी ओजस्वी भाषणं आणि भारताची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी ओळखले जाते.