कर्णधार सुनील छेत्री पुन्हा ठरला तारणहार, 81 व्या मिनिटाला गोल, अंतिम फेरीत स्थानाची शक्यता वाढली
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
ओडिशाच्या भुवनेश्वरमधील इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेतील सामन्यात जागतिक क्रमवारीत आपल्याहून बऱ्याच खालच्या क्रमांकावर असलेल्या वानुआतूवर भारताला केवळ 1-0 विजय मिळविता आला. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने पुन्हा एकदा तारणहाराची भूमिका बजावताना हा एकमेव गोल केला. कलिंगा स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात 81 व्या मिनिटाला छेत्रीने हा गोल करून भारतीय खेळाडू आणि चाहत्यांना दिलासा दिला तसेच अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या दृष्टीने संघाची स्थिती मजबूत केली.
याआधी शुक्रवारी भारताने मंगोलियाला 2-0 ने पराभूत केले होते. 38 वर्षीय छेत्रीने आपल्या 135 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात केलेल्या या गोलानिशी तिसरा सर्वांधिक गोल नोंदवणारा प्रबळ सक्रिय खेळाडू म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. शिवाय त्याने गोल केल्याचा आनंद व्यक्त करताना आपण लवकरच पिता होणार आहे, हा संदेशही जगाला दिला. त्यासाठी त्याने चेंडू त्याच्या जर्सीच्या खाली पोटावर सरकविला. यावेळी त्याची पत्नी सोनम मोठ्या पडद्यावर टाळ्या वाजवताना दाखवण्यात आली.

दोन विजयांसह सहा गुण घेऊन भारत सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. शेवटच्या साखळी सामन्यात ते गुऊवारी लेबनॉनविरुद्ध खेळणार आहेत. 101 व्या क्रमांकावर असलेल्या भारताने पहिल्या सत्रात चेंडू 62 टक्के ताब्यात ठेवला आणि प्रतिस्पर्ध्यांवर गोल नोंदविण्याचे किमान डझनभर प्रयत्न केले. परंतु त्यापैकी बहुतेक लक्ष्याच्या बाहेर राहिले. जागतिक क्रमवारीत 164 व्या क्रमांकावर असलेल्या वानुआतुला पहिल्या सत्रामध्ये एकही फटका लक्ष्यावर हाणता आला नाही.
नवोदित नंदकुमार सेकरने पहिल्या सत्रात भारताला गोल नोंदविण्याची लाभलेली खरीखुरी संधी वाया घालवली आणि 36 व्या मिनिटाला महेश नाओरेमने दिलेल्या सुंदर पासवर चेंडू बाहेर फटकावला. नाओरेम हा वानुआतूच्या बचावासाठी खरा धोका ठरला. 40 व्या मिनिटाला उजवीकडून त्याने पुरविलेला आणखी एक क्रॉस छेत्रीच्या डोक्यावरून काही इंचांवरून गेला. अन्यथा केवळ गोलरक्षक समोर असताना छेत्रीला यावेळी गोल नोंदविण्याची चांगली संधी होती. मध्यांतर जवळ पोहोचलेले असताना भारताने गोल करण्यासाठी भरपूर दबाव आणला, पण त्यांना यश मिळू शकले नाही.
भारताने दुसऱ्या सत्रातही हा दबाव कायम ठैवला. परंतु वानुआतूच्या खेळाडूंनी बचाव क्षेत्रात गर्दी करण्याचे धोरण पत्करल्याने स्पष्ट संधी मिळू शकली नाही. 61 व्या मिनिटाला भारताची मेहनत जवळपास सार्थकी लागल्याचे दिसून आले होते. यावेळी नाओरेमने डावीकडून आणखी एक उत्कृष्ट क्रॉस दिला होता आणि छेत्रीने त्यावर हेडरही मारला होता. परंतु गोलरक्षक मासिंग कलोतांग समोर आल्याने त्याला पुढचे दिसण्यात अडथळा आला आणि चेंडू बाहेर गेला.
प्रशिक्षक स्टिमॅकने त्यानंतर ताबडतोब अनिऊद्ध थापा, जिक्सन सिंग आणि सहल अब्दुल समद यांना उतरवून नाओरेम, रोहित कुमार आणि रॉलिन बोर्जेस यांना हटविले. काही मिनिटांनंतर सेकरला हटवून लाललियानझुआला छांगटेला आणण्यात आले. नव्या दमाचे खेळाडू उतरवूनही भारतीयांना वानुआतूच्या बचावाला भेदण्यात अपयश आले. परंतु शेवटी छेत्रीने आपला दर्जा दाखवून देताना पुन्हा एकदा संघाला वाचविले. याप्रसंगी शुभाशिष बोसने वानुआतूच्या बचाव क्षेत्रात डाव्या बाजूने क्रॉस दिला आणि निर्धारित वेळ संपण्यास नऊ मिनिटे बाकी असताना छेत्रीने डाव्या पायाने हाणलेला चेंडू गोलरक्षक कलोतांगला हलण्याचीही संधी न देता जाळ्यात गेला.









